पाकिस्तानची सुहाई, भेटा एका सुपरकॉपला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 07:00 AM2018-11-29T07:00:00+5:302018-11-29T07:00:06+5:30
सुहाई अजीज. पाकिस्तानातली यंगेस्ट सुपरकॉप! कोण आहे ही? सध्या जगभर तिच्या साहसाची का चर्चा आहे?
कलीम अजीम
‘मुली नाजूक नाही बहादूर असतात; धाडसीच नाही तर त्या महत्त्वाकांक्षीदेखील असतात..’
पाकिस्तानच्या सुहाई अजीजचं हे वाक्य. गेल्या आठवडय़ात ते वारंवार पाकिस्तान चॅनल्सनेच नाही तर जगभरात अनेक वाहिन्यांनी दाखवलं. 30 वर्षाची पाकिस्तानी तरुण मुलगी असं काही बेधडक सांगतेय, याचंच हे अप्रूप नव्हतं, तर ती जे बोलली ते तिनं करून दाखवलं होतं. 22 नोव्हेंबरची ही गोष्ट. त्यादिवशी कराची शहरातल्या चीनच्या वाणिज्य दूतावासावर आत्मघाती हल्ला झाला. पोलीस अधिकारी म्हणून काम करणार्या सुहाईनं तेव्हा तीन हल्लेखोरांना कंठस्नान घातलं. या हल्लेखोरांकडून मोठय़ा प्रमाणात शस्रं आणि दारूगोळा जप्त करण्यात आला.
सुहाईच्या या ‘बहादुरीचे किस्से’ मग जगभरातील मीडियात आणि सोशल मीडियातही आम झाले. पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून अनेक महत्त्वाचे नेते आणि सेलिब्रिटींनी तिची जाहीर प्रशंसा केली. फेसबुक व ट्विटरवर तर सुहाईच्या कर्तृत्वाचं हे जंगी सेलिब्रेशन आठवडाभर चालू होतं. जगभरातील नेटिझन्सनं त्यांना ‘सुपरकॉप लेडी’ असा किताबही देऊन टाकला.
सुहाई अजीज हिचं वर सांगितलेलं विधान खरं तर जुनं आहे. म्हणजे 2013 सालचं. सिव्हिल सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर तिनं हे विधान केलं होतं. ऐन पंचविशीत सेंट्रल सुपरिअर सव्र्हिसेस ही परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केली. अत्यंत कमी वयात ही परीक्षा उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळवला. तेव्हाही वर्षभर पाकिस्तानी मीडिया तिच्या यशाच्या कौतुकानं रंगला होता. पाच वर्षानंतर मात्र तिनं आपली कर्तबगारी आणि आपलं विधान अक्षरशर् जगून दाखवलं.
पाच वर्षापूर्वी प्राइड ऑफ पाकिस्तान या वेबपोर्टलनं तिची यशकथा दीर्घ स्वरूपात प्रकाशित केली होती. खडतर प्रवासातून यश मिळवल्याच्या अनेक नोंदी या लेखातून समोर येतात. त्या लेखात तिनंच आपल्या प्रवासाचे अनेक रोचक किस्से सांगितले आहेत. सिंध प्रातांतील एका मध्यमवर्गीय घरात जन्मलेल्या सुहाई, त्यांचे नातेवाईक म्हणत होते धार्मिक शिक्षण घे, मुलींनी जास्त शिकू नये. मात्र अशा वातावरणात तिचे वडील अजीज तालपूर सुहाईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी कुटुंबाविरोधात बंड करून आधुनिक शिक्षण देणार्या एका शाळेत सुहाईला घातलं. परिणामी कुटुबांनं त्यांच्यावर बहिष्कार घातला. या घटनेनं व्यथित होऊन अजीज तालपूर यांनी गाव सोडलं. मुलीच्या शिक्षणासाठी आप्तस्वकियांना सोडून त्यांनी स्थलांतर स्वीकारलं.
हैदराबादला आल्यावर शिक्षण सुरू झालं. सुहाईला वाटे आर्किटेक्ट व्हावं, कधी वाटे गरीब रुग्णांच्या सेवेसाठी न्यूरोसर्जन व्हावं तर की वाटे उंच आकाशात उडावं वैमानिक व्हावं. मात्र करिअरची वाट काहीतरी भलतंच मनात ठेवून होती.
हैदराबादला त्यांनी बी.कॉम.र्पयत शिक्षण घेतलं. त्यानंतर सिंध यूनिव्हर्सिटीमधून त्यांनी अर्थशास्नत मास्टर पूर्ण केलं. दरम्यानच्या काळात देशात राजकीय अस्थिरता व हिंसक कारवाया वाढल्या होत्या. देशात सैन्य शासन आलं. त्याकाळात तिनं ठरवलं पोलीस व्हावचं. त्यासाठीच्या परीक्षांची तयारी सुरू झाली आणि त्यात यशही मिळवलं.
एएसपी रँक मिळाली. सेवेत रुजूही झाल्या. ज्या भागानं त्यांना स्थलांतर करण्यास भाग पाडलं होतं, त्याच भागात अभिमानानं त्यांनी देशसेवा करण्यास सुरुवात केली. तालपूर कुटुंबासाठी ही गौरवाची गोष्ट होती. लेखक व सामाजिक कार्यकर्ते असलेले त्यांचे वडील अजीज तालपूर मुलींच्या यशानं प्रचंड आनंदी झाले. आता तर या नव्या कामगिरीनं त्यांच्या लेकीचं नाव जगभर पोहचलं आहे. राज्य सरकारकडून सुहाईंना बढती देण्यात आली आहे. इतकंच नाही तर राज्य सरकारनं त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना देशातील सर्वोच्च समजल्या जाणार्या ‘कायदे आझम’ पदकाची शिफारसदेखील केली आहे.
एका मुलीची ही लढाई सार्या दहशतीला पुरून उरली आहे.
(लेखक स्वतंत्र पत्रकार आहेत)