#metoo : तरुणांना काही थेट सवाल, कुठल्या हिशेबात मर्द बनता?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 02:12 PM2017-10-25T14:12:24+5:302017-10-26T09:43:52+5:30
#metoo हा हॅशटॅग वापरून जगभरातल्या मुली/महिला आपल्यावर होणा-या लैंगिक बळजबरीच्या कहाण्या लिहित आहेत. त्यात ज्यांना दोष दिला जातोय त्या तरुणांना काही थेट सवाल. हे प्रश्न डोक्यात जातील; पण पाहा उत्तरं देता येतात का?
- योेगेश दामले
मित्रांच्या भांडणांत
‘‘भाय ! चल गाडी काढ,
कोन नडला तुला?’’
म्हणणारे लोक
डोळ्यासमोर पोरींना कुणी त्रास देत असेल,
तर त्याला फटकावत का नाहीत?
आपल्या मर्दानगीच्या
बेसिक व्याख्यांमध्ये
काही गडबड आहे का?
दिवाळी संपली. कॉलेज सुरू होणार. मित्र परत भेटतील.
घरचे फराळ, घरचे फोटो शेअर कराल.
या घोळक्यात तीपण असेल...
चोरून चोरून जिच्यावर आपोआप नजर जाते,
जिने तुम्हाला परतून पाहावं असं वाटतं, ती.
असे तुमच्या ग्रुप्ससारखे शेकडो ग्रुप्स असतील.
तुमच्यासारखेच शेकडो यंगस्टर्स आणि त्यांच्या शेकडोंनी क्रश,
तुम्हा शेकडो हृदयांतल्या कोट्यवधी धडधडी.
यात दोन आकडे कमी झालेत.
तुमच्यातल्याच दोन मुली.
पहिली, अनोळखी मुलगा
नको तितक्या जवळ आला म्हणून घाबरली.
तिने सरळ चालत्या ट्रेनमधून उडी टाकली.
अंगावर येणारा तो एक स्पर्श फार घाण होता म्हणून.
त्या स्पर्शापुढे ८० किलोमीटरच्या वेगाने
ट्रेनमधून जमिनीवर पडणं, लोखंडावर,
दगडांवर आदळणं, समोरून दुसरी ट्रेन येतेय का,
याचा विचार न करणं कमी त्रासाचं होतं.
तिचे फ्रॅक्चर जुळतीलही.
पण ती बरी होईल का?
ती ट्रेनमध्ये चढायला घाबरेल का?
ती वेगाने जिने उतरायला घाबरेल का?
ती सगळ्या अनोळखी हातांना घाबरेल का?
तिला कुणावर तुमच्यासारखाच सहज क्र श जन्मात येऊ शकेल का?
हे ज्याच्या हिरोगिरीमुळे झालं, त्याच्या हे लक्षात तरी येईल का?
दुसरी मुलगी अशाच मुलाच्या तावडीत अडकली होती.
तिने अरेला कारे करायची हिंमतही दाखवली.
तिला मिळालं काय? बेशुद्ध होईपर्यंत मार, आणि ब्लेडचे वार.
हे घडताना डझनांनी लोक हजर होते. कुणीच आलं नाही.
त्या मुलीचे कट्स भरून निघतील.
पण तीही या धक्क्यातून बरी होईल का?
ती चारचौघात बिनधास्त चालेल का?
ती अनोळखी लोकांना विश्वासाने सहज पाहू शकेल का?
मुख्य म्हणजे,
तिची पुन्हा कुणी छेड काढायला गेलं,
तर ती ब्लेड आठवून गप्प बसेल,
की पुन्हा समोरच्याला थोबडवेल?
कोण असतात हे रोडरोमिओ? कुठून येतात?
आणि सगळेच रोमिओ या टोकाला जातात?
काही असतात, गपचूप पाहणारे.
समोरचीला लक्षात येईपर्यंत डोळ्यांनी टोचणारे.
पण ती ओरडून सांगणार कुणाला?
पुरावा देणार कशाचा?
तो रोमिओही कधी कॉलेजात होता.
त्याचाही तुमच्यासारखा पहिला क्र श होता.
त्यानेही तुमच्या क्र शसारखं
तिला गुपचूप पाहिलं असेल.
त्याला प्रतिसाद न मिळाल्यावर
त्याने अजून डोळे रोखले असतील.
‘पाहा माझ्याकडे !
एक वयात आलेला रसरशीत मर्द तुला पाहतोय!
तुला दाद देतोय!
तुझी ही हिंमत?’
असं न किंचाळता ओरडत असेल.
तो कल्ला तिला ऐकू गेल्यावर
तिने वैतागून रस्ता बदलला असेल.
आपलं पुरुषत्व,
आपल्याला लाइन न देणाºया एका मुलीला
इतकं नामोहरम करू शकतं,
याचाच कैफ त्याला चढून,
तो दुसरं, तिसरं, चौथं सावज पकडत असेल.
ही वाढलेली भूक मग हळूच चोरटे स्पर्श,
घरापर्यंत पाठलाग, कॉल्स, ई-मेल, ब्लेड, अॅसिडपर्यंत पोचते.
कुठली मर्दुमकी यात?
कुठला मर्द असं करतो?
सिनेमांचं सांगू नका.
त्यातही असले मर्द मरतातच.
जे मिळवायचं ते न मिळवता.
पाहा.
ओझरत्या नजरेची चेंडूफेक
हाताबाहेर गेली की काय काय करू शकते.
या चेंडूंना वेग कुठून मिळतो?
‘ए निक्या, ती बघ आली तुझी मशीन !’
‘खामोश रे भाईलोग ! अपनी भाभी जा रैली है!’
‘ए बोल ना! आऊं क्या?’
‘लाल दुपट्टेवाली!’
असल्या हाका ज्यांना उद्देशून मारल्यायत
त्यांना ऐकू येण्याइतपत मोठ्याने मारून.
त्या पोराला लाजवून.
ज्या पोरीवरून लाजवलंय, तिलाही लाजवून.
पोराच्या मनात काय रुजतं?
ही आपल्या नावाला लाजते, काहीतरी आहे इथे.
पोरीच्या मनात काय रुजतं?
पोरं ही सगळी अशीच.
आवाज काढला तर कॉलेजमध्ये गॉसिप,
नाही काढला एका छेडीवर एक छेड फ्री,
कॉलेजमध्ये, ट्रेनिंगवर,
नोकरीच्या ठिकाणी,
साखरपुडा, लग्न.. सगळ्याच टप्प्यांवर.
कॉलेजला जाणं,
पिक्चर टाकणं,
बेस्टीजबरोबर फिरणं,
बॅकपॅकिंग करत भारत पाहणं,
घरापासून लांब शिकणं,
फॅशनचे प्रयोग करणं,
नाइटआउट्स करणं,
दांडिया नाचायला जाणं,
लॉँग ड्राइव्हवर जाणं,
नोकरी करणं,
शिक्षण करणं,
घराबाहेर पडणं..
इतक्या बेसिक गोष्टी आहेत यार !
तुम्ही बिनधास्त करू शकता तर पोरी का नाही?
निव्वळ त्यांची बदलती तरुण शरीरं
कुतूहलाचा विषय आहेत म्हणून?
तुम्हाला कुणी फुटत्या आवाजात
जाणूनबुजून बोलायला लावलं
तर तुमच्यात बोलायचा उत्साह राहील?
तुम्ही हात उचलल्यावर
कुणी तुमच्या केसाळ होणाºया काखेकडे पाहिलं तर
तुमच्या हालचाली सहज होतील?
सकाळी झोपेत अवघडल्यावर
कुणी तुमचं पांघरूण खेचून हसलं
तर तुम्ही गाढ झोपू शकाल?
लोकलमध्ये, स्टेशनच्या जिन्यात
कुणी तुम्हाला जाणूनबुजून खेटलं
तर तुम्हाला रोज ट्रेन पकडावीशी वाटेल?
सिनेमा हॉलमध्ये कुणी तुमच्या सीटच्या
फटीत हातपाय घातला तर
तुम्ही सिनेमात गुंताल की शेजारच्या अंधारात?
- हे प्रश्न एका मुलाने तुम्हा मुलांना विचारले
म्हणून काहीजणांना विकृतही वाटतील,
पण हेच रोज रोज बायांशी करणारे
कुठल्या हिशेबात मर्द बनतात?
मग मित्रांच्या भांडणांत
‘‘भाय! चल गाडी काढ, कोन नडला तुला?’’
म्हणणारे लोक
डोळ्यांसमोर पोरींना कुणी त्रास देत असेल,
तर त्याला फटकावत का नाहीत?
मर्दानगीच्या बेसिक व्याख्यांमध्ये
काही गडबड आहे का?
आता पुन्हा वरचे प्रश्न वाचा.
ज्या ज्या प्रश्नांवर हा लेखक डोक्यात गेला,
ते हायलाइट करून ठेवा.
आपल्या अवतीभवती पाहा.
असं वागणारे लोक तुम्हाला
कुठेतरी इंटरेस्टिंग वाटतात?
एकदा तरी सुमडीत
त्यांंच्यासारखं करून पाहावंसं वाटतं?
वरून धवनचा बदरी,
रांझना मधला धनुष,
डर मधला शाहरूख,
एक टक्काही हीरो फिगर वाटतात?
अरे हो, सिनेमावरून आठवलं,
पद्मावती येतोय,
त्यात खिलजीच्या हाती सापडण्यापेक्षा
आगीत उडी मारणारी हिरोईन असणारे.
ती राणी,
आणि ट्रेनमधून उडी मारणारी मुलगी
कुठल्यातरी पातळीवर सारख्याच आहेत.
मध्ये सात-आठशे वर्षं जाऊनही.
घरी जा. भाऊ, भावाचे मित्र,
वडील, वडिलांचे मित्र,
काका यांना पाहा.
त्यात कुणी असं आहे.
असं काही घडलं,
तर वहिनी, आई, काकू,
आत्यांना कसं वाटलं असेल?
तुमच्या लहान-मोठ्या बहिणींना पाहा.
त्या त्याच समाजात रोज जाताहेत.
त्यांना काय वाटतंय, याचा विचार केलाय कधी?
कुणाची तरी मुलगी,
कुणाची तरी बहीण
कधी तरी जन्मभरासाठी
तुमच्याही बरोबर राहायला येणार आहे.
त्यांना हवा असलेला निर्धास्तपणा
तुम्ही त्यांना देऊ शकण्याइतके मर्द आहात?
पुढे तुम्हाला मुलगी झाली
तर तिला कुठलं जग मिळावंसं तुम्हाला वाटेल?
शेवटी तोच जुना, चावून चोथा झालेला प्रश्न.
तुमच्या (लेखी) आयाबहिणी आहेत की नाहीत?
damle.yogesh@gmail.com