मेळघाटातील मित्रांसाठी ‘धडक’ मोहीम

By admin | Published: August 14, 2014 03:29 PM2014-08-14T15:29:46+5:302014-08-14T15:29:46+5:30

मेळघाटाचं सगळंच विचित्र. उन्हाळ्यात इतकं ऊन पडेल की, चामडी सोलून निघेल. हिवाळ्यात इतकी थंडी पडेल की हाडं गोठावीत. आणि पावसाळ्यात इतका पाऊस की अनेक गावांची चक्क बेटं व्हावीत.

'Shocked' campaign for friends in Melghat | मेळघाटातील मित्रांसाठी ‘धडक’ मोहीम

मेळघाटातील मित्रांसाठी ‘धडक’ मोहीम

Next
>मेळघाटाचं सगळंच विचित्र. उन्हाळ्यात इतकं ऊन पडेल की, चामडी सोलून निघेल. हिवाळ्यात इतकी थंडी पडेल की हाडं गोठावीत. आणि पावसाळ्यात इतका पाऊस की अनेक गावांची चक्क बेटं व्हावीत. 
त्यात बहुतांश ठिकाणी रस्ता नाही, बस नाही, वीज नाही. आरोग्याच्या पुरेशा सोयी नाहीत. कित्येकदा रुग्णाला झोळी करून खांद्यावरून घेऊन जावं लागतं. प्रामुख्यानं कोरकू आदिवासी इथे राहतात.
कुपोषण आणि बालमृत्यूमुळेही हा परिसर ‘कुप्रसिद्ध’ आहे. कुपोषणामुळे दरवर्षी शेकडो बालकांचा इथे मृत्यू होतो. अनेक कारणं. नैसर्गिक परिस्थिती, अज्ञान, अंधश्रद्धा, अनारोग्य, बेरोजगारी. ही मुलं वाचावीत, कुपोषण थांबावं यासाठी काय करता येईल? वेगवेगळ्या क्षेत्रांतील काही तरुणांनी काही वर्षांपूर्वी ही परिस्थिती पाहिली आणि त्यांनी ठरवलं, इथले प्रश्न इथे राहूनच सुटू शकतात, कमी होऊ शकतात. त्यातूनच १९९७ मध्ये ‘मैत्री’ची (‘मेळघाट मित्र’) स्थापना झाली आणि तेव्हापासून ‘मैत्री’च्या वतीनं मेळघाटात दरवर्षी ‘धडक मोहीम’ही राबवली जाते. महाराष्ट्रातून ठिकठिकाणांहून तरुण येथे येतात, दहा दिवस राहतात, त्यांच्यात राहून, त्यांच्यासाठी काम करतात आणि परत जातात. गेल्या १८ वर्षांपासून सलग हा उपक्रम सुरू आहे.
‘मैत्री’चे काही सदस्य तर वर्षभर मेळघाटातच राहून त्यांच्यासाठी काम करतात. मात्र इतर स्वयंसेवकांसाठी दरवर्षी पावसाळ्यात धडक मोहिमेचं आयोजन केलं जातं. 
यंदाही १८ जुलैपासून धडक मोहिमेला सुरुवात झाली असून, २९ सप्टेंबरपर्यंत ही मोहीम चालणार आहे. त्यासाठी तीस-तीस मुलांच्या एकूण दहा मोहिमा आखण्यात आल्या असून, स्वयंप्रेरणेनं आणि स्वखर्चानं महाराष्ट्रभरातून तरुण प्रत्यक्ष तिथे जाऊन काम करतील.
सामाजिक तळमळ आणि इच्छा असणार्‍या ज्या संवेदनशील तरुणांना प्रत्यक्ष तिथे जाऊन दहा दिवस काम करायचं असेल, त्यांना त्यात सहभाग घेता येईल. मात्र या मोहिमेचं एक मुख्य सूत्र म्हणजे ही ‘पिकनिक’ नाही, स्वत:ला जोखण्याचा, काही वेगळं करून पाहण्याचा, आयुष्यभरासाठी एक वेगळा अनुभव घेऊन पाहण्याचा तो ‘पाठ’ आहे.
कोणाला सहभागी होता येईल?
१८ वर्षांवरील कोणाही तरुण, तरुणीला. स्वयंप्रेरणेनं हा सहभाग असल्यानं तिथला प्रवास खर्च, राहणं, जेवण यासाठीचा साधारण हजार रुपयांपर्यंतचा खर्च स्वयंसेवकालाच करावा लागेल.
मेळघाटात काय करायचं? 
सहा वर्षांवरील मुलांच्या आजारांवर लक्ष ठेवणं.
एक वर्षाखालील सर्व मुलांच्या घरी दररोज भेट देणं.
गरोदर स्त्रियांना दररोज भेटणं आणि त्यांना मार्गदर्शन करणं.
गावातील लोकांना सोबत घेऊन सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम राबवणं. 
साध्या आजारांवर उपचार करणं.
प्रथमोपचार पद्धती राबवणं. 
शासकीय आरोग्य विभाग आणि आदिवासी यांच्यात दुवा साधणं. 
डूज अँण्ड डोण्ट्स
धडक मोहिमेला निघण्यापूर्वी आपल्या घरच्यांना संपूर्ण माहिती द्या.
गटप्रमुखांच्या सूचनांचं तंतोतंत पालन करावं लागेल. 
व्यसनांपासून दूर राहावं लागेल. इत्यादि.यापुढच्या मोहिमा- २२ ऑगस्ट, २९ ऑगस्ट, ५ सप्टेंबर, १२ सप्टेंबर, १९ सप्टेंबर १४
‘दूरस्थ’ स्वयंसेवक
ज्यांना धडक मोहिमेत सहभागी होणं शक्य नाही, पण या उपक्रमाविषयी आस्था आहे, ते किराणा, औषधं, प्रथमोपचार साहित्य किंवा आर्थिक मदतही देऊ शकतात. 
अधिक माहितीसाठी संपर्क : 
मधुकर माने  : ७५८८२४४२३१
वेबसाइट :www.dhadakmohim. wordpress.com

Web Title: 'Shocked' campaign for friends in Melghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.