कोल्हापुरातल्या तरुण मुलांनी एकत्र येत सुरु केली झाडांची भिशी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 02:00 AM2017-09-28T02:00:00+5:302017-09-28T02:00:00+5:30

कोल्हापुरातल्या तरुण मुलांनी एकत्र येत एक भन्नाट भिशी सुरू केली आहे. नियम भिशीचेच. पण त्या पैशातून लावायची मात्र रोपं ती कशी? त्याचीच ही गोष्ट.

Young children from Kolhapur started coming together | कोल्हापुरातल्या तरुण मुलांनी एकत्र येत सुरु केली झाडांची भिशी

कोल्हापुरातल्या तरुण मुलांनी एकत्र येत सुरु केली झाडांची भिशी

Next

संतोष मिठारी

‘ग्रीन व्हिजन’चे प्रमुख अवनीश जैन म्हणाले, ‘लोकमत’ने या भिशीसंदर्भात प्रसिद्ध केलेली बातमी सोशल मीडियाद्वारे राज्यासह देशभरातील अनेकांपर्यंत पोहोचली. त्यानंतर अनेकांनी हा उपक्रम स्वत:च्या परिसरात, शहरात सुरू करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधला. या उपक्रमांबाबत कौतुक केले. आमचा हा उपक्रम पाहून अनेकांनी आम्हाला विविध स्वरूपातील मदत देण्यासाठी हात पुढे केला आहे. त्यात देणगीच्या रूपात आर्थिक मदत, रोपे यांचा समावेश आहे. आता मिलिंद धोंड, हार्दिक वसा, आदींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या उपक्रमाची व्याप्ती वाढविणार आहोत.

भिशी. हा शब्द आपल्या सगळ्यांना माहिती आहे.
अनेकजण दरमहा भिशी लावतात. त्यातून एखादी वस्तू घेतात. भिशीच्या निमित्तानं भेटतात, गप्पा मारतात. खातातपितात.
पण झाडांची भिशी लावता येते हे ऐकलंय तुम्ही कधी?
नाही ना, पण कोल्हापुरातील एका तरुण ग्रुपने अशी भिशी सुरू करत एक नवीन विचार रुजवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी सोशल मीडियाचाही त्यांनी उत्तम उपयोग करून घेतला आहे.
‘ग्रीन व्हिजन’ या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपने एक ‘झाडांची भिशी’ सुरू करून वृक्षारोपण, संवर्धनाची मोहीम हाती घेतली आहे. शिक्षण घेत, व्यवसाय सांभाळत पर्यावरण रक्षणासाठी हा एक अभिनव उपक्रम या तरुणांनी हाती घेतला आहे. धान्य व्यावसायिक असलेल्या ३२ वर्षीय अवनीश जैन यांना व्हॉट्सअ‍ॅपवर झाडांच्या भिशीसंदर्भात सोलापूरमध्ये सुरू असलेल्या एका उपक्रमाची माहिती मिळाली. त्यांनी या संकल्पनेची थोेडक्यात माहिती घेतली आणि कोल्हापूरमध्ये अशी भिशी सुरू करण्यासाठी इच्छुकांना सहभागी होण्याचं आवाहनही व्हॉट्सअ‍ॅपवरूनच केलं. त्यांना अल्पावधीतच चांगला प्रतिसाद मिळाला. यातून त्यांनी तिसºयाच दिवशी ४७ जणांचा समावेश असलेला ‘ग्रीन व्हिजन व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप’ सुरू केला. त्यातील बहुतांश सदस्य हे १८ ते ३२ वयोगटातले आहेत. आणि या साºयांनी एकत्र येऊन ठरवलं की, आपण सुरू करायची झाडांची भिशी.
या भिशीची संकल्पना अगदी सोपी आहे. ग्रुपच्या प्रमुखांकडे दरमहा किमान दोनशे रुपये हे सदस्य जमा करतात. त्यानंतर चिठ्ठी टाकून दोन नावं काढली जातात. ज्यांची नावं येतील त्या सदस्यांना नेहमीप्रमाणे भिशीची रक्कम देण्यात येते. हे सदस्य त्या रकमेतून रोपं आणि ट्री-गार्ड खरेदी करतात. दर महिन्यातील पहिल्या रविवारी ग्रुपमधील सर्व सदस्य ती रोपं ठरवलेल्या जागी लावतात. या झाडांच्या देखभालीची जबाबदारी चिठ्ठीमध्ये नाव आलेल्या त्या दोन सदस्यांची असते. गेल्या जूनमध्ये त्यांनी झाडांच्या भिशीअंतर्गत पहिलं वृक्षारोपण केलं. त्यानंतर त्यांनी शहरातील विविध ठिकाणी सुमारे चारशे झाडे लावली. कोल्हापूरच्या वातावरणात वाढू शकतील, ज्यांना कमी पाणी लागेल अशी स्थानिक झाडं लावण्यावर हा ग्रुप भर देतो. नुस्ती झाडं लावून काम तर संपत नाहीच उलट सदस्यांवर ती झाडं जगवण्याची जबाबदारीही असते. दरवर्षी जून ते आॅक्टोबरदरम्यान वृक्षारोपण करायचं आणि मग त्या रोपांना नियमित खतपाणी देऊन संवर्धनाचे काम नोव्हेंबर ते जून या काळात करायचं असा हा उपक्रम आहे.
झाडांची ही भिशी म्हणूनच जबाबदारीचं, एकत्र येऊन विधायक काम करण्याचं आणि समविचारी दोस्तांचं एक खास सूत्र ठरतं आहे.

वेळ वाचविणारी प्रक्रिया
या उपक्रमामध्ये तरुण मुलांनी आधुनिक तंत्रज्ञान, सोशल मीडियाचा पूरेपूर वापर केला आहे. बहुतांश सदस्यांनी तर एका वर्षाचे २४०० रुपये ‘ग्रीन व्हिजन’च्या अ‍ॅडमिनकडे आधीच जमा करून टाकले आहेत. दर महिन्याच्या १५ किंवा १६ तारखेला हे अ‍ॅडमिन सदस्यांच्या नावांच्या चिठ्ठ्या तयार करतात. चिठ्ठ्या तयार करणं ते निवडण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया शूट केली जाते. तो व्हिडीओ ग्रुपवर अपलोड केला जातो.

भिशीत सहभागी तरुण काय सांगतात...
आहारतज्ज्ञ असलेली आरती ओसवाल म्हणाली, या भिशीची संकल्पना ‘युनिक’ वाटली. माझ्या घराच्या परिसरात झाडे लावणे, रस्त्यांच्या कडेला असणाºया एक-दोन झाडांना कधी बॉटलने पाणी घालणं असं माझं काम सुरू होतं. मात्र, या भिशीने एक आगळी-वेगळी संधी दिली. रविवार एरव्ही निवांत असायचा, आता तो या झाडांच्या संगतीत जातो. महिनाभर काम केल्यानंतर येणारा तणाव, काहीसा मानसिक थकवा आता या उपक्रमांमुळे दूर झाला आहे. दरमहा वृक्षारोपणाच्या उपक्रमातून आम्ही ‘फ्रेश’होत आहोत.
सराफ व्यावसायिक असणारा अंकित ओसवाल सांगतो, या भिशीमध्ये आमच्यापेक्षा वय आणि अनुभवाने मोठ्या असणाºया व्यक्ती आहेत. त्यांचे मार्गदर्शन आणि आमचे नियोजन यातून भिशीची मोहीम पुढे सरकत आहे. चार महिन्यांपूर्वी आम्ही मोहीम सुरू केली. याअंतर्गत एका ठिकाणी लावलेल्या झाडांवर अ‍ॅसिड टाकून ती नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, संबंधित ठिकाणी आम्ही पुन्हा झाडं लावून त्या परिसरातील लोकांना त्यांच्या देखभालीसाठी आवाहन केलं.
पर्यावरण सल्लागार म्हणून कार्यरत असणारी पल्लवी जाजू सांगते, पर्यावरणाची संस्कृती शालेय विद्यार्थ्यांमध्ये रुजल्यास त्याचा अधिक चांगला परिणाम होणार आहे. ते लक्षात घेऊन आम्ही या भिशीच्या माध्यमातून पहिल्यांदा शाळांच्या परिसरात वृक्षारोपण करण्याचं ठरवलं आहे.
जीतू ओसवाल सांगतो, माझ्या एका फे्रंडकडून या भिशीच्या उपक्रमाचा मेसेज मला आला. तो वाचल्यानंतर या उपक्रमात मी सहभागी झालो. एक-दोघेजण वगळता या भिशीतील सर्वजण सुरुवातीला एकमेकांना अनोळखी होते. मात्र, आता आम्ही चांगले दोस्त झालो आहोत.
संयम राठोड सांगतो, माझ्या घराच्या आवारात मी स्वत:ची बाग विकसित केली. या भिशीत मी आणि माझा मित्र जीतू यात सहभागी झालो. त्यातून एक वेगळं समाधान मिळत आहे. आधी सुटीदिवशी मुव्ही बघायला जाणे, शहराबाहेर फिरायला जायचो, आता झाडं लावता येतील अशा जागा शोधत असतो.

‘झाडांची भिशी’
सुरू करायची असेल तर हे लक्षात ठेवा..
* पहिल्यांदा किमान बारा सदस्य असणं गरजेचं आहे.
* सदस्यांनी ठरावीक रक्कम दरमहा जमा करण्याचं नियोजन करावं.
* सर्वांना सोयीस्कर ठरणाºया दिवसाची वृक्षारोपणासाठी निवड करावी.
* ग्रुपमध्ये विविध वयोगटांतील व्यक्ती असू शकतात. तरुणांनी पुढाकार घ्यावा.
* आपल्या परिसरातील वृक्षतज्ज्ञ, पर्यावरणप्रेमींचा सल्ला घ्यावा.
* योग्य पद्धतीने वृक्षारोपण करण्यासाठी माळीकाम करणाºया व्यक्तीची मदत घ्यावी.
* स्थानिक झाडांची रोपणासाठी निवड करावी.

Web Title: Young children from Kolhapur started coming together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.