राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू दे, चंद्रकांत पाटलांचे विठ्ठलाकडे साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 03:28 AM2017-10-31T03:28:24+5:302017-10-31T15:19:16+5:30
कार्तिकी यात्रेच्या एकादशी सोहळ्या दिवशी विठ्ठल-रुक्मिणीची पूजा करण्याची संधी मिळत आहे. राज्यातील शेतक-याचे उत्पादन वाढू दे, त्यांच्या उत्पदनाला चांगला भाव देण्याची आमची क्षमता वाढू दे, असे साकडे घातल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
- प्रभु पुजारी/ सचिन कांबळे
पंढरपूर : कार्तिकी एकादशीनिमित्त महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची भक्तीमय वातावरणात शासकीय महापूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत विठ्ठलाची पूजा करण्याचा यंदाचा मान कर्नाटकमधील बळीराम शेवु चव्हाण आणि शिनाबाई चव्हाण या वारकरी दांपत्याला मिळाला.
कार्तिकी यात्रेच्या एकादशी सोहळ्या दिवशी विठ्ठल-रुक्मिणीची पूजा करण्याची संधी मिळत आहे. राज्यातील शेतक-याचे उत्पादन वाढू दे, त्यांच्या उत्पादनाला चांगला भाव देण्याची आमची क्षमता वाढू दे, असे साकडे घातल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तसेच, मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिर समितीचे अधिकारी, पोलीस अधीक्षक एस विरेश प्रभु, उपविभागीय पोलीस अधिकारी पिंगळे, अभय डोंगरे, पोलीस निरीक्षक विठल दबडे यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी, महसूल प्रशासनातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
कार्तिकी यात्रेचा मानाचे वारकऱ्याचा मान बळीराम शेवु चव्हाण (वय ४०) व शिनाबाई बळीराम चव्हाण (वय ३५, रा.हडगल्ली, ता. जि. विजापूर) यांना मिळाला. यावेळी बळीराम चव्हाण यांनी सांगितले की, मी कर्नाटक राज्य परिवहन महामंडळात वाहक आहे. गेली ६ वर्षे पंढरपुरची वारी करतो. मला रविराज व संगीता ही दोन उच्च शिक्षित जुळी मुले आहेत. याचबरोबर, महाराष्ट्रातील एस.टी. महामंडळ कर्मचारी बंधूंना चांगल्या पध्दतीने वेतन मिळावे,तसेच त्यांच्या मागण्या शासनाने पूर्ण कराव्यात अशी विठ्ठल चरणी साकडे घातले असल्याचेही बळीराम चव्हाण यांनी सांगितले.
तीन लाख भाविक
कार्तिकी यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातून तीन लाख भाविक पंढरपुरात आले आहेत. दर्शनासाठी भाविकांना १८ ते १९ तास लागत आहेत. मंदिर समितीतर्फे ८९ सीसीटीव्ही कॅमे-यातून संपूर्ण वारीवर नजर ठेवून आहेत.