४० वर्षानंतर ५४ ग्रामस्थांना मिळाले मालकीहक्काचे प्रमाणपत्र; परभणीतील शेंद्रा गावचा प्रलंबित प्रश्न मार्गी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 07:18 PM2017-12-19T19:18:55+5:302017-12-19T19:20:01+5:30
परभणी :तालुक्यातील पूनवर्सित शेंद्रा गावातील ५४ ग्रामस्थांना १८ डिसेंबर रोजी मालकी हक्काचे कबाले प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. मराठवाडा कृषी ...
परभणी:तालुक्यातील पूनवर्सित शेंद्रा गावातील ५४ ग्रामस्थांना १८ डिसेंबर रोजी मालकी हक्काचे कबाले प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. मराठवाडा कृषी विद्यापीठात जमीन गेल्याने तब्बल ४० वर्षांपासून मालकीहक्काचा प्रश्न प्रलंबित होता. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव यांनी पाठपुरावा केल्याने ग्रामस्थांना जिल्हा कचेरीत हे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
जिल्ह्यातील शेंद्रा आणि बलसा ही दोन गावे उठवून या गावांचे पूनर्वसन केले होते. पूनवर्सित शेंद्रा येथे २४० जणांच्या नावे भूखंड देण्याचा निर्णय झाला. परंतु, काही भूखंडाबाबत ग्रामस्थांमध्ये एकमत नव्हते. त्यामुळे मालकीहक्क देण्याबाबत अडचणी निर्माण झाल्या. ४० वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव यांनी या संदर्भात पाठपुरावा केला.
पालकमंत्री गुलाबराव पाटील, आ.डॉ.राहुल पाटील यांनी विशेष बैठकही घेतली होती. तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनीही सकारात्मक भूमिका घेत ग्रामस्थांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर सोमवारी तहसीलदार कडवकर यांच्या कक्षात ५४ ग्रामस्थांना मालकीहक्काचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, उपविभागीय अधिकारी सुुचिता शिंदे, तहसीलदार विद्याचरण कडवकर, उपजिल्हाधिकारी संजय कुंडेटकर, नायब तहसीलदार विसपुते, अंकुश मंडळकर, सुधाकर ढगे, कैलास ढगे, गजानन आणेराव आदींची उपस्थिती होती.