परभणी येथे अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 12:40 AM2017-12-11T00:40:04+5:302017-12-11T00:40:21+5:30
शिक्षणामुळे आपली व पर्यायाने समाजाची प्रगती होते़ शिक्षणातूनच वैचारिक लढाई लढता येते़ ज्ञान मिळविण्यासाठी प्रत्येकाच्या घरी ग्रंथालये निर्माण झाली पाहिजेत़ ज्ञान मिळाल्यानेच वैचारिक लढा देता येऊ शकतो, असे प्रतिपादन साहित्यिक तथा विचारवंत एकनाथ उर्फ अनिल मोरे यांनी केले़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शिक्षणामुळे आपली व पर्यायाने समाजाची प्रगती होते़ शिक्षणातूनच वैचारिक लढाई लढता येते़ ज्ञान मिळविण्यासाठी प्रत्येकाच्या घरी ग्रंथालये निर्माण झाली पाहिजेत़ ज्ञान मिळाल्यानेच वैचारिक लढा देता येऊ शकतो, असे प्रतिपादन साहित्यिक तथा विचारवंत एकनाथ उर्फ अनिल मोरे यांनी केले़
परभणी येथील बी़ रघुनाथ सभागृहात १० डिसेंबर रोजी राज्यस्तरीय अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्ष पदावरून मोरे बोलत होते़ व्यासपीठावर माजी मंत्री सुरेशराव वरपूडकर, जमीन अधिकार आंदोलनाचे नेते विश्वनाथ तोडकर, कॉ़ अशोक उफाडे, डॉ़ अनिल कांबळे, राजेश उफाडे, उत्तम गोरे, अनिल नेटके, कॉ़ गणपत भिसे, विजय क्षीरसागर, वर्षाताई लांडगे, जोशीला लोमटे आदींची उपस्थिती होती़ यावेळी मोरे म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांनी स्वत: गरिबी जगली़ त्यामुळे त्यांनी आपले अनुभव पुस्तकातून व्यक्त करीत गरीबांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले़ या माध्यमातून अण्णा भाऊंनी माणसे जपली़ त्यामुळे त्यांच्या विचारांचे अनुकरण करावे़ आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, चांगल्या शाळेत गेले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले़ साहित्य संमेलन विचारांचे संमेलन आहे़ यातून प्रत्येकाची वैचारिक भूमिका मांडली जाते, असे सांगत समाजाने आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी एकत्रित लढले पाहिजे, असे त्यांनी सांगितले़ यावेळी माजी मंत्री सुरेश वरपूडकर, डॉ़अनिल कांबळे, विजय क्षीरसागर, राजेश उफाडे यांनीही मार्गदर्शन केले़ अशोक उफाडे यांनी सूत्रसंचालन केले़ यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती़
चळवळ जनतेची बनली पाहिजे- तोडकर
मातंग समाजावर अजूनही अनेक ठिकाणी अन्याय, अत्याचार केले जातात़ स्मशानभूमीसाठी अजूनही लढा उभारावा लागतो़ त्यामुळे संघटनेच्या माध्यमातून एकत्र येत संघटनेला बळ दिले पाहिजे़ यातूनच आपले प्रश्न मार्गी लागतील, असे मत संमेलनाचे उद्घाटक विश्वनाथ तोडकर यांनी व्यक्त केले़ तोडकर म्हणाले, प्रश्न मार्गी लावण्यासाठी समाजानेच आता कार्यकर्त्यांना पाठबळ दिले पाहिजे़ कोण्या एकट्याचे प्रश्न नसून सर्व समाजाचे आहेत़ त्यामुळे एकत्रित येत प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले़ तसेच सध्या यात्रा, जत्रा, गुलाल उधळणे या माध्यमातून समाजाला मागे नेण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप तोडकर यांनी केला़ आजही आपला समाज अशिक्षीत असून, शिक्षण घेऊन अण्णा भाऊ साठे यांचे लिखाण वाचले पाहिजे, असे आवाहनही तोडकर यांनी केले़
स्टॉल्सवर गर्दी
यावेळी सभागृहाच्या परिसरामध्ये पुस्तकांचे विविध स्टॉल्स उभारण्यात आले होते़ पुस्तकांच्या स्टॉल्सवर नागरिकांची सकाळपासूनच गर्दी होती़ तसेच मान्यवरांचे विचार ऐकण्यासाठी सभागृहही खचाखच भरले होते़ परिसंवाद, लोकसंवादासही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.