आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज बांधवांचा गंगाखेड तहसीलवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 04:42 PM2018-08-13T16:42:20+5:302018-08-13T16:43:08+5:30
धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गाचे आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी धनगर समाजाच्या वतीने आज बंद पुकारण्यात आला होता.
गंगाखेड (परभणी ) : धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गाचे आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी धनगर समाजाच्या वतीने आज बंद पुकारण्यात आला होता. यावेळी शहरातील खंडोबा मंदिर येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी साजरी करून खंडोबा मंदिर ते तहसिल कार्यालयापर्यंत रॅली काढून नायब तहसीलदार गंगाधर काळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
राज्यातील धनगर समाजाला घटनेमध्ये एस.टी. प्रवर्गाचे आरक्षण दिल्याची नोंद ३६ व्या क्रमांकावर आहे. मात्र त्याची अंमलबजावणी आजतागायत झालेली नाही. राज्यात सत्तेवर असलेल्या सरकारने २०१४ साली झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीदरम्यान आम्ही सत्तेवर येताच पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. चार वर्ष पूर्ण झाल्यानंतर ही केंद्र व राज्यात सत्तेवर असलेल्या सरकारने हा निर्णय घेतला नसल्याचे निवेदनात नमुद करून महाराष्ट्रातील धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गाचे आरक्षण द्यावे, अहिल्याबाई होळकर शेळीमेंढी विकास महामंडळाला दोन हजार कोटी रुपये अनुदान द्यावे, पावसाळ्यात वनक्षेत्रात मेंढ्या चराईसाठी मान्यता द्यावी, मेंढपाळासाठी प्रत्येक जिल्ह्यात गायरान जमीन देवुन चारा उपलब्ध करून घ्यावा, सोलापुर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव द्यावे, मध्यप्रदेशातील माहेश्वरी समाधी स्थळी अहिल्याबाई होळकर यांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, राज्यातील प्रत्येक विद्यापीठाच्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहाची स्थापना करावी आदी विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनावर जितेश गोरे, भाऊसाहेब कुकडे, नारायण घनवटे, जयदेव मिसे, भगवान बंडगर, रखमाजी लवटे, पंकज मूलगीर, दिपक मरगीळ, लखन व्होरे, कृष्णा गोरे, किशन व्होरे, बालासाहेब कुकडे, शिवराज चिलगर, शिवाजी कुकडे, विकास लवटे, लहू भाळे, यशवंत लवटे, सुभाष ठावरे, पवन सोन्नर, राम वाघमारे, सुरेश कोरडे, मुंजाजी भुमरे, गजानन भुसनर, गणेश शेंडगे, नारायण वैद्य आदी बहुसंख्य धनगर समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.