अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी पाथरी तालुक्यातील १५ गावांत ग्रामदक्षता समित्यांची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 06:10 PM2018-02-01T18:10:03+5:302018-02-01T18:10:53+5:30
अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी तालुक्यातील १५ वाळू घाटांच्या गावांमध्ये ग्रामदक्षता समित्यांची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे़
पाथरी ( परभणी ) : अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी तालुक्यातील १५ वाळू घाटांच्या गावांमध्ये ग्रामदक्षता समित्यांची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे़
पाथरी तालुक्यातील गोदावरी नदीपात्रामध्ये २२ वाळूचे घाट आहेत. वाळू घाटाचा लिलाव होण्यापूर्वी तसेच लिलाव झाल्यानंतरही मोठ्या प्रमाणात वाळूचे अवैध उत्खनन करुन वाहतूक केली जात असल्याचा प्रकार तालुक्यात घडत आहे़ त्यामुळे शासनाचा लाखो रूपयांचा महसूल वाया जात आहे़ राज्य शासनाने अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी ग्राम दक्षता समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे़ पाथरी तालुक्यातही उपजिल्हाधिकारी सी.एस.कोकणी यांच्या आदेशाद्वारे समित्यांची स्थापना करण्यात आली आहे़ यामध्ये पाटोदा, मरडसगाव, गोपेगाव, मसला खु., नाथरा, मंजरथ, निवळी, रामपुरी खु., गुंज खु., गौंडगाव, उमरी, अंधापुरी, मुद्गल आणि विटा या गावांचा समावेश आहे. अवैध वाळू रोखण्यासाठी गाव पातळीवर समित्या नेमल्या आहेत. त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. समित्यांनी जबाबदारी यशस्वी पार पाडली तर अवैध वाळू उपशावर अंकुश बसेल, अशी प्रतिक्रिया उपजिल्हाधिकारी कोकणी यांनी दिली़
समितीला धरले जाणार जबाबदार
पाथरी तालुक्यात समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत़ यामध्ये गावचे सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, तलाठी, कोतवाल यांचा समितीमध्ये समावेश आहे. या समितीला वाळू उत्खनन व उपशावर निर्बंध घालण्याचे अधिकार देण्यात आले आहेत़ तसेच अवैध वाळू उत्खनन व वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास या समितीलाच जबाबदार धरण्यात येणार आहे.