हिंगोली-परभणी एसटीत जुने तिकीट देऊन वाहकाने केली प्रवाशाची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2017 12:42 AM2017-12-28T00:42:11+5:302017-12-28T12:15:27+5:30
हिंगोली ते परभणी एसटीने प्रवास करणाºया प्रवाशाला जुने तिकीट देऊन फसवणूक केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला असून, या प्रकरणी परभणी येथील आगार प्रमुखांकडे संबंधित प्रवाशाने तक्रार दाखल केली आहे.
परभणी : हिंगोली ते परभणी एसटीने प्रवास करणा-या प्रवाशाला जुने तिकीट देऊन फसवणूक केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला असून, या प्रकरणी परभणी येथील आगार प्रमुखांकडे संबंधित प्रवाशाने तक्रार दाखल केली आहे़
शहा नगर भागातील रहिवाशी शेख मुनीर शेख कालू हे बुधवारी सकाळी हिंगोली येथून उमरखेड-अहमदनगर या एमएच डीटी-४३६२ क्रमांकाच्या बसने सकाळी ९़४० वाजता परभणीला येण्यासाठी बसमध्ये बसले़ यावेळी या बसमधील वाहकाने त्यांच्याकडून ८३ रुपये घेऊन परभणीचे तिकीट दिले़ शेख मुनीर यांनी प्रारंभी घाईत ते तिकीट खिशात ठेवले़ थोड्यावेळानंतर त्यांनी तिकीटाची पाहणी केली असता, त्या तिकीटावर २६ डिसेंबर २०१७ अशी तारीख व तिकीट काढल्याची वेळ रात्री ८ वाजून ३४ मिनिट २९ सेकंदाची नमूद असल्याचे दिसून आले़ शिवाय तिकीटावरील बसचा क्रमांक एल ९८४३ होता़ त्यामुळे त्यांना हे जुने तिकीट असल्याचे लक्षात आले़ त्यांनी इतर प्रवाशांकडे चौकशी केली असता त्यांना बरोबर तिकीट होते़
याबाबत त्यांनी संबंधित वाहकाकडे विचारणा केली असता, वाहकाने त्यांना तांत्रिक चुकीमुळे जुने तिकीट आले असेल, थोड्यावेळानंतर बोलतो असे सांगितले़ त्यानंतर त्यांनी थोड्यावेळाने पुन्हा वाहकाकडे विचारणा केली असता, वाहकाने टाळाटाळीचे उत्तर दिले़
परभणीत बस येईपर्यंत वाहकाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही़ सकाळी ११़४५ च्या सुमारास ही बस परभणीत आल्यानंतर प्रवासी शेख मुनीर यांनी ‘लोकमत’ कार्यालयात येऊन याबाबत तक्रार केली़ त्यानंतर आगारप्रमुख धर्माधिकारी यांना याबाबत त्यांनी तक्रार अर्ज दिला़ त्यामध्ये संबंधित वाहकावर कार्यवाही करण्याची मागणी केली़ याबाबत आगारप्रमुख धर्माधिकारी यांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे सांगितले़