परभणी जिल्हा कचेरीवर धडकला भटक्या विमुक्तांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 12:51 AM2018-07-19T00:51:04+5:302018-07-19T00:51:39+5:30
राईनपाडा हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी सकल भटक्या विमुक्त जाती संघटनेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : राईनपाडा हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी सकल भटक्या विमुक्त जाती संघटनेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
राईनपाडा हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, मृतांच्या वारसांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची शासकीय मदत द्यावी, भटक्या विमुक्तांसाठी तिसरी सूची तयार करावी, या प्रमुख मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आल्या. शहरातील शनिवार बाजार येथून दुपारी १२ वाजेच्या सुमारास या मोर्चाला प्रारंभ झाला. जोशी समाज, गोसावी समाज, डवरी गोसावी समाज, सिकलकरी समाज, वैंदू समाज, बहुरुपी, गारुडी समाज, कैकाडी समाज, जोगी समाज आदी भटक्या समाजातील महिला, पुरुष पारंपारिक वेषभूषेत मोर्चात सहभागी झाले होते. भटक्या विमुक्तांना न्याय मिळालाच पाहिजे, राईनपाडा घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
शनिवार बाजार, शिवाजी चौक, गांधी पार्क, नारायणचाळ, विसावा कॉर्नर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. आंदोलनस्थळी सकल भटक्या विमुक्त जाती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.धर्मराज चव्हाण, भगवान भोळे, ज्ञानेश्वर भोसले, बाबासाहेब भोसले, गोविंद सरवदे, रामेश्वर भोळे, पंडित भोसले, दिलीप हरगावकर, मदन नरवाडे, अशोक नरवाडे, रेड्डीसिंग बावरी, आनंद वंजारी, सटवाजी भोळे, साधनाताई राठोड आदींनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. राईनपाडा सारख्या घटना यापुढे घडू नयेत, यासाठी समाजाने काळजी घ्यावी, शिक्षणाची कास धरावी, संघटीत होऊन आपले हक्क मिळवावेत, असे आवाहन यावेळी वक्त्यांनी केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
सत्ता ताब्यात घ्या : आंबेडकर
भारिप-बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली, परंतु भटक्या विमुक्तांचे पुनर्वसन झाले नाही. राज्यकर्त्यांना भटक्या समाजाविषयी आस्था नसल्यानेच हा प्रश्न सुटला नाही. त्यामुळे त्यांच्याकडून आता न्याय मिळण्याचीही अपेक्षा नाही.
समाजाला विकासाच्या मार्गावर आणयचे असेल तर सत्ता मिळविणे हा एकच पर्याय आहे. त्यामुळे मताचा योग्य वापर करुन सत्ता काबीज करा. त्यासाठी संघटित व्हा, सत्ता ताब्यात असेल तरच आपले प्रश्न सुटतील, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. यावेळी लक्ष्मणराव माने यांनीही आंदोलकांना मार्गदर्शन केले. महापौर मीनाताई वरपूडकर यांनीही आंदोलकांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतले.