सेलुतील जवानाची पत्नी व मुलगी अरूणाचल प्रदेश येथून २३ दिवसांपासून बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 06:25 PM2017-10-13T18:25:47+5:302017-10-13T18:31:29+5:30
सेलू येथील भारतीय सैन्य दलातील जवानाची पत्नी आणि एक वर्षाची मुलगी अरूणाचल प्रदेशातील टेंगा येथून २० सप्टेंबरपासून बेपत्ता झाली आहे. २३ दिवस उलटूनही या दोघांचा शोध लागत नसल्याने जवानासह कुटुंबिय चिंताग्रस्त झाले आहेत.
परभणी, दि. १३ : सेलू येथील भारतीय सैन्य दलातील जवानाची पत्नी आणि एक वर्षाची मुलगी अरूणाचल प्रदेशातील टेंगा येथून २० सप्टेंबरपासून बेपत्ता झाली आहे. २३ दिवस उलटूनही या दोघांचा शोध लागत नसल्याने जवानासह कुटुंबिय चिंताग्रस्त झाले आहेत. अरुणाचल प्रदेशातील स्थानिक पोलीस प्रशासन त्यांचा योग्य पद्धतीने शोध घेत नसल्याचा आरोप करत गोंडगे कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे.
सेलू येथील अनिल गोंडगे (मूळ गाव गोंडगे पिंपरी, ता. सेलू) हे भारतीय सैन्य दलात नायक पदावर कार्यरत आहेत. काही महिन्यापूर्वीच त्यांची अरूणाचल प्रदेशातील टेंगा या ठिकाणी नियुक्ती झाली होती. जवान गोंडगे हे पत्नी आणि दोन मुलांसह अरूणाचल प्रदेशातील टेंगा या ठिकाणी असलेल्या लष्करी वसाहतीत राहतात. २० सप्टेंबर रोजी त्यांची पत्नी स्वप्ना (वय ३३) व एक वर्षाची मुलगी आरा यांनी टेंगा येथून जवळ असलेल्या नागोबा मंदिराला जात असल्याचे सांगून घर सोडले होते. रात्री उशिरापर्यंत स्वप्ना या परत न आल्याने त्यांचा शोध सुरू केला. परंतु, परिसरातील ८ ते ९ कि.मी. पर्यंत शोध घेऊनही दोघांचाही थांग पत्ता लागला नाही. त्यानंतर अनिल गोंडगे यांनी पत्नी स्वप्ना व मुलगी आरा हे बेपत्ता झाल्याची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये नोंदविली.
सीसीटीव्हीत दिसून आले होते
भारतीय सैन्य दल, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव बल, आयटीबीपी यांच्या पथकानीही स्वप्ना व आरा याचा शोध सुरू केला होता. यावेळी डोंगरा पोस्ट जवळील सीसीटीव्ही कॅमे-यात स्वप्ना व मुलगी आरा हे दोघे एका वाहनात बसल्याचे फुटेज आढळले. परंतु, त्यानंतरही या दोघांचाही शोध लागला नाही. अरूणाचल प्रदेश आणि आसाम सिमेपर्यंत भारतीय सैन्य दलाने शोध घेतला. परिसरातील पालिकोम यासह महत्त्वाच्या रेल्वेस्थानकावरही शोध लागला नाही. त्यामुळे चिंतातूर असलेले जवान अनिल गोंडगे हे ओम (वय ७) या मुलासह ११ आॅक्टोबर रोजी सेलू येथील घरी परतले. दरम्यान, २३ सप्टेंबर रोजी अनिल गोंडगे यांच्या वहिणी वंदना आणि
सासरे प्रल्हादराव काळे यांच्या मोबाईल क्रमांकावर अनोळखी कॉल आले. परंतु, फोनवर कोणीही बोलले नाही. कॉल आलेल्या नंबरच्या आधारे शोध लावावा, अशी मागणी गोंडगे कुटुंबियांंनी केली आहे. तसेच स्थानिक पोलिसांनी गांभीर्याने मोहीम राबविली नाही. आसाम, अरूणाचल भागात बोडो उल्फा, अल्फा या स्थानिक संघटना हिंसाचार घडवितात. अनावधानाने पत्नीने आसाम राज्याची सीमा ओलांडली असेल तर अपहरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांनी शोध घेण्यासाठी मदत करावी, अशी मागणी नायक अनिल गोंडगे यांनी केली आहे.