परभणीत सरपंचांनी अडवली गटविकास अधिकार्याची गाडी; स्वाक्षरी करण्यास करीत होते टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 03:01 PM2018-01-20T15:01:44+5:302018-01-20T15:19:50+5:30
ब्राह्मणगाव येथील शासकीय कामकाजाच्या एमबीवर सही करण्यास टाळाटाळ करणार्या गटविकास अधिकार्यांची गाडी अडवून सरपंचांनी त्यांना जाब विचारला. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. रस्त्यातच बाचाबाचीही झाली. त्यानंतर गटविकास अधिकार्यांनी कक्षात जावून सही केल्याने प्रकरण निवळले.
परभणी : तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील शासकीय कामकाजाच्या एमबीवर सही करण्यास टाळाटाळ करणार्या गटविकास अधिकार्यांची गाडी अडवून सरपंच यांनी त्यांना जाब विचारला. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. रस्त्यातच बाचाबाचीही झाली. त्यानंतर गटविकास अधिकार्यांनी कक्षात जावून सही केल्याने प्रकरण निवळले.
परभणी तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील शाळेच्या संरक्षण भिंतीचे काम १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून मंजूर झाले आहे. या कामाच्या निविदाही निघाल्या असून एमबी रेकॉर्ड तयार करण्यात आले. या फाईलवर गटविकास अधिकार्यांची स्वाक्षरी लागते. येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम.व्ही. करडखेलकर यांच्याकडे स्वाक्षरीसाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आला. ब्राह्मणगावचे सरपंच गजानन तुरे आणि संतोष काळदाते यांनी करडखेलकर यांच्याकडे अनेक वेळा चकरा मारल्या. मात्र ते स्वाक्षरी करीत नसल्याने काम थांबले होते.
शनिवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास गजानन तुरे आणि संतोष काळदाते दोघेही गटविकास अधिकारी करडखेलकर यांच्या कक्षात आले. मात्र यावेळीही करडखेलकर यांनी स्वाक्षरी केली नाही. त्यामुळे संतप्त झालेले तुरे आणि काळदाते हे कक्षाबाहेर येऊन रस्त्यावर थांबले. कामकाज अटोपून करडखेलकर चारचाकी गाडीने निघाले तेव्हा रस्त्यातच त्यांची गाडी अडविण्यात आली. यावेळी तुरे आणि करडखेलकर यांच्यात बाचाबाची झाली. या प्रकारामुळे बघ्यांची गर्दीही झाली होती. जोपर्यंत स्वाक्षरी होत नाही, तोपर्यंत गाडी पुढे नेऊ देणार नाही, असा पवित्रा घेतल्यानंतर करडखेलकर यांनी दोघांनाही परत आपल्या कक्षात बोलावले आणि फाईलवर स्वाक्षरी केली. त्यामुळे प्रकरण निवळले.
दरम्यान, करडखेलकर यांची गाडी अडविल्याची माहिती समजल्यानंतर तालुक्यातील अनेक सरपंच आणि पंचायत समिती सदस्य करडखेलकर यांच्या कक्षात दाखल झाले. यावेळी करडखेलकर यांच्या विषयी सर्वांनीच संताप व्यक्त केला. अधिकारी सह्या करीत नसल्याने विकासकामे थांबली आहेत. ग्रामस्थांना तोंड देताना आम्हाला नाकी-नऊ येते, अशी भावना व्यक्त करीत करडखेलकर यांच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली. यावेळी पंचायत समिती सदस्य भरत कच्छवे, टाकळी बोबडेचे सरपंच सचिन बोबडे आदींची उपस्थिती होती