परभणी जिल्हा परिषदेतील प्रकार : नंदुरबारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची परभणीत कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:37 AM2018-01-18T00:37:00+5:302018-01-18T00:37:07+5:30
नंदुरबार, नाशिक, धुळे आदी ठिकाणी कार्यरत असताना बेहिशोबी मालमत्ता जमविल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर नंदुरबार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी दुपारी १२ वाजता परभणीतील जिल्हा परिषदेच्या परिसरातून बांधकाम विभागातील उपअभियंता एम.बी. भोई यांना अचानक उचलले. त्यामुळे उपस्थित कर्मचाºयांना काही वेळ कळालेच नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : नंदुरबार, नाशिक, धुळे आदी ठिकाणी कार्यरत असताना बेहिशोबी मालमत्ता जमविल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर नंदुरबार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी दुपारी १२ वाजता परभणीतील जिल्हा परिषदेच्या परिसरातून बांधकाम विभागातील उपअभियंता एम.बी. भोई यांना अचानक उचलले. त्यामुळे उपस्थित कर्मचाºयांना काही वेळ कळालेच नाही.
मूळचे नंदुरबार येथील रहिवासी असलेले उपअभियंता मोहनलाल बन्सीलाल भोई यांची परभणी जिल्हा परिषदेत आॅक्टोबर अखेरीस नियुक्ती बदली झाली होती. त्यांच्याकडे गंगाखेड उपविभागाचा पदभार देण्यात आला आहे. बुधवारी जिल्हा नियोजन समितीची परभणीत बैठक असल्याने जिल्हाभरातील विविध विभागांचे अधिकारी शहरात दाखल झाले होते. या पार्श्वभूमीवर उपअभियंता मोहनलाल भोई हे देखील परभणीत आले होते. एकीकडे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरु असताना उपअभियंता भोई हे जिल्हा परिषदेतच होते. दुपारी १२ वाजेच्या सुमारास ते जिल्हा परिषदेच्या प्रांगणात उभे असताना अचानक साध्या वेषातील ५ ते ६ जणांच्या पोलीस पथकाने त्यांना पकडले. उपस्थितांना भोई यांना अचानक का पकडले, हे समजलेच नाही. ज्यावेळी संबंधित पोलीस कर्मचाºयाने आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नंदुरबार येथील कर्मचारी असल्याचे सांगितले, त्यानंतर कुठे भोई यांच्या अचानक पकडण्यामागचे कारण उपस्थितांना कळाले. त्यानंतर या पथकाने याबाबतची माहिती जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे यांना देण्याचा प्रयत्न केला. परंतु, सवडे हे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम.व्ही. करडखेलकर हे कार्यालयीन कामानिमित्त नांदेडला गेले असल्याने तेही जि.प.त उपस्थित नव्हते. शिवाय बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गोवंदे हे ही जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत असल्याने त्यांचाही या पथकाशी संपर्क झाला नाही. त्यामुळे या पथकातील अधिकाºयांनी याबाबतचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे यांचे स्वीय सहाय्यक जोशी यांच्याकडे दिले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाºयांनी उपअभियंता भोई यांना जीपमध्ये बसवून नंदुरबारकडे नेले. या सर्व प्रक्रियेच्या वेळी जिल्हा परिषदेत पदाधिकाºयांची उपस्थिती कमी असली तरी बघ्यांची मात्र चांगलीच गर्दी झाल्याचे दिसून आले.
भोई यांच्यासह त्यांच्या पत्नीवरही गुन्हा दाखल
बांधकाम विभागातील उपअभियंता मोहनलाल बन्सीलाल भोई यांच्या विरोधात बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याबाबतची नंदुरबार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने या विभागाच्या वतीने चौकशी करण्यात आली. चौकशीअंती भोई यांनी धुळे, शाहदा, नंदुरबार व नाशिक येथे नोकरी करीत असताना बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचे निदर्शनास आले. त्यांना त्यांची पत्नी चंद्रकला मोहनलाल भोई यांनी सहाय्य केल्याप्रकरणी त्यांच्यावरही नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच अनुषंगाने नंदुरबारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी परभणीत कारवाई केली. परभणीतील अन्य काही अधिकाºयांची नावे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे असल्याची चर्चा यानिमित्ताने ऐकावयास मिळाली.