पूर्णा नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 06:21 PM2018-05-15T18:21:00+5:302018-05-15T18:21:00+5:30
पूर्णा नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या एका २४ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली.
पूर्णा (परभणी) : पूर्णा नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या एका २४ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी पूर्णा पोलिसात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी निम्न दुधना प्रकल्पातून सोडलेल्या पाण्यामुळे शहराजवळून वाहणाऱ्या पूर्णा नदीला पाणी वाढले आहे. आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास सिद्धार्थ नगर परिसरातील रहिवाशी असलेला शे.पाशा शे.जमाल ( २४ ) हा त्याच्या दोन मित्रांसह जुन्या बंधारा परिसरात पोहण्यासाठी गेला. यावेळी पाण्यात पोहत असताना शे.पाशा हा बाहेर येत नसल्याने त्याच्या मित्रांनी आरडाओरड केली. त्यांनी त्याचा शोध घेतला परंतु तो सापडला नाही. घटने बाबत त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले. यावरून पोलीस कर्मचारी,परिसरातील कोळी बांधव व नागरिकांनी शोध मोहीम सुरू केली. सकाळी १०.३० च्या दरम्यान शे पाशा याचा मृतदेह पात्रात आढळून आला. या प्रकरणी मयताचा भाऊ शे.मोइनोद्दीन शे.जमाल याच्या माहितीवरून पोलिसात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.
मदती साठी सरसावले हात
नदी पात्रात एक युवक बुडल्याची वार्ता कळताच शहरातील सर्व धर्मीय नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचा शोध घेताना या परिसरात राहणाऱ्या कोळी बांधवांनी मोठी मेहनत घेतली.