Vastu Shastra: आजारपण, नैराश्य आणि अपयश घरापासून कायम दूर ठेवण्यासाठी 'हे' पाच उपाय करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 01:18 PM2024-04-20T13:18:52+5:302024-04-20T13:20:45+5:30

Vastu Tips: सद्यस्थितीत लोक शारीरिक आजाराला कमी आणि मानसिक आजाराला जास्त सामोरे जात आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे वाढता ताणतणाव आणि संवादात निर्माण झालेली दरी! त्यामुळे एकेक व्यक्ती म्हणजे चालता बोलता अणुबॉम्ब नाहीतर ज्वालामुखी सारखी ज्वलनशील झाली आहे. वाद-विवाद, तक्रारी, भांडणं यात नमते कोणी घ्यायचे, माघार कोणी घ्यायची यावरूनही वाद होतात, म्हणजे बघा! तुमच्याही घरात असे तणावाचे वातावरण असेल किंवा तसे होण्याची शक्यता दिसत असेल तर वास्तू शास्त्राचे पाच नियम आवर्जून फॉलो करा.

वास्तुशास्त्रात वास्तूच्या प्रत्येक कानाकोपऱ्याचा विचार करून त्यानुसार रचना कशी असायला हवी ते सुचवले जाते. योग्य वस्तू योग्य दिशेला असेल तरच ती योग्य परिणाम देते, हा वास्तू शास्त्राचा आग्रह आहे आणि त्यानुसार केलेला अभ्यासही आहे. म्हणून तुम्ही देखील तुमच्या वास्तूची आणि कुटुंबीयांची काळजी घेण्यासाठी पुढील पथ्य पाळा! त्यासाठी जाणून घ्या पाच मुख्य नियम!

झोपताना पूर्व किंवा दक्षिणेला डोकं करून झोपा. त्यामुळे झोप तर चांगली लागतेच, शिवाय वाईट विचार मनात येत नाहीत किंवा नकारात्मकताअ वाढत नाही. ज्यांना नैराश्य किंवा निद्रानाश झाल्याचे जाणवते त्यांनी झोपण्याची दिशा अशाप्रकारे बदलून पहा, निश्चितच लाभ जाणवेल.

घराच्या मध्यभागी झोपू नका! घराचा मध्यभाग ही भारितभूमी असते. पूर्ण वास्तूचा डोलारा त्या मध्य भागावर अवलंबून असतो. त्यामुळे तिथे झोपल्याने शरीराला वेगवेगळ्या व्याधी होण्याची शक्यता असते. तब्येत बिघडते, तसेच झोप न लागण्याची तक्रार सुरु होते. त्यामुळे वास्तूच्या मध्यभागी झोपणे टाळा.

पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून जेवा. त्यामुळे पचन संस्थेशी निगडित तक्रार उद्भवत नाही. तसेच ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी दक्षिण पश्चिम दिशेला तोंड करून जेवल्याने वजन कमी होईल अर्थात पचन शक्ती वाढेल आणि स्वास्थ्य सुधारेल.

दक्षिण पूर्व दिशेला स्वयंपाक घर असणे वास्तूच्या दृष्टीने हितावह ठरते. विशेषतः पूर्व दिशा ही सकारात्मक मानली जाते. त्यामुळे त्या दिशेला स्वयंपाक घर असेल तर अन्नदोष निर्माण होणार नाही आणि ते अन्न ग्रहण केल्यामुळे सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहील.

उत्तर पूर्व दिशेला बाथरूम असेल तर घरातल्या बायकांना त्याचा जास्त त्रास होतो. तुमचे न्हाणीघर अर्थात बाथरूम त्या दिशेला असेल तर तिथे नकारात्मकता निर्माण होऊ शकते. म्हणून त्या दिशेला नेहमी मिठाच्या पाण्याचे भांडं ठेवावे, जेणेकरून तिथे निर्माण होणारी नकारात्मकता पाण्यात शोषली जाईल. ते पाणी रोज सकाळी बदलून टाका आणि शक्य असेल तर बाथरूमची दिशा बदला.