Maratha Reservation: quit hotel job, sold ancestral land; Read the history of Manoj Jarange Patil
हॉटेलची नोकरी सोडली, वडिलोपार्जित जमीन विकली; मनोज जरांगे पाटलांचा इतिहास वाचा By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 01:19 PM2023-11-02T13:19:45+5:302023-11-02T13:25:27+5:30Join usJoin usNext मराठा समाजाला आरक्षण देण्यास महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी एकमत केले आहे. तसेच मराठा आंदोलकांना शांततेचं आवाहन केले आहे. पण महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर अजूनही तोडगा निघताना दिसत नाही. सर्वपक्षीय बैठक होऊनही मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलेले नाही. मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची महाराष्ट्रातील दुसरे अण्णा हजारे अशीही ओळख होऊ लागली आहे. चला जाणून घेऊया कोण आहे मनोज जरांगे पाटील जे एवढ्या मोठ्या मराठा समाजाच्या आंदोलनाचा इतका मोठा चेहरा बनलेत? मूळचे बीड येथील रहिवासी असलेल्या मनाज जरांगे यांचा जन्म मोतारी गावात झाला. २०१० मध्ये त्यांनी १२वी उत्तीर्ण केली आणि त्यानंतरच त्यांनी शिक्षण सोडले. शिक्षण सोडून ते मराठा आंदोलनात सहभागी झाले. यासोबतच ते एका हॉटेलमध्ये काम करायचे. हॉटेलमध्ये काम करून त्यांनी थोडेफार उत्पन्न मिळवले, पण असे असतानाही मराठा आंदोलनावरील त्यांचे प्रेम त्यांना मागे हटू देत नव्हते. मराठा समाजाच्या चळवळीत त्यांनी हिरारीने सहभाग घेतला. जरांगे पाटील यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. जरांगे पाटलांच्या कुटुंबात आई वडील, पत्नी आणि मुले आहेत. जरांगे पाटील हे कुटुंबापेक्षा समाजाच्या हिताला जास्त महत्त्व देतात. मनोज जरांगेंकडे वडिलोपार्जित ४ एकर जमीन आहे. आंदोलनासाठी या ४ एकरपैकी २ एकर जमीन त्यांनी विकली. मराठा आंदोलनासाठी त्यांनी ‘शिवबा’ नावाच्या संघटनेचीही स्थापना केली. समाजसेवेची आवड स्वस्थ बसू देत नसल्याने मराठा समाजासाठी त्यांनी बऱ्याचदा मोर्चे काढले, आंदोलने केली. रास्ता रोको केला. त्यातूनच मनोज जरांगे हे नाव मराठवाड्यात चर्चेत आले. २९ ऑगस्टला मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी जालनातील अंतरवाली सराटी इथं आमरण उपोषणाला सुरुवात केली. १ सप्टेंबर रोजी याठिकाणी पोलिसांनी बळाचा वापर केला. त्याची बातमी माध्यमांमध्ये झळकली, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. जालनातील याच लाठीचार्ज आंदोलनानंतर उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील हे नाव महाराष्ट्राच्या लक्षात आले. जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी केलेल्या या आंदोलनाला राज्यभरात पाठिंबा वाढत गेला. सुरुवातीला मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या अशी जरांगे पाटील यांची मागणी होती. सप्टेंबर महिन्यात मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतरवाली सराटीत दाखल झाले होते. यावेळी जरांगे पाटलांनी सरकारला ४० दिवसांची मुदत दिली होती. मराठा समाजाला ४० दिवसांत आरक्षण न मिळाल्यास मी पुन्हा उपोषणाला बसेन आणि पाणीत्यागही करेन असा इशारा जरांगेंनी दिला होता. ४० दिवसांचा अल्टिमेटम संपल्यानंतर जरांगे पाटलांनी २४ ऑक्टोबरपासून पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केली. जरांगे पाटील यांनी केलेला महाराष्ट्र दौरा त्याला मिळणारा प्रतिसाद यातून मराठा समाजाची लढाई जरांगेंच्या नेतृत्वात लढली जाणार हे स्पष्ट झाले. आज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला ९ दिवस झाले. मात्र अद्याप आरक्षणप्रश्नावर काही तोडगा निघाला नाही. टॅग्स :मनोज जरांगे-पाटीलमराठा आरक्षणManoj Jarange PatilMaratha Reservation