Shiv Sena BJP to shake hands for lok sabha election 2019 here is the reason
आता युती होणार... तुम्हाला 'खरं' कारण कळलं का? By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 05:23 PM2019-01-30T17:23:46+5:302019-01-30T17:43:39+5:30Join usJoin usNext 'हवेत विरले स्वबळाचे नारे, वाहू लागले युतीचे वारे...' असं म्हणत कालपासून बरेच जण शिवसेनेची खिल्ली उडवताहेत. स्वाभाविकही आहे म्हणा ते. कारण, 'आता युती नाही, शिवसेना स्वबळावरच लढणार', अशी गर्जना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अख्खा महाराष्ट्र फिरून केली होती. पण, आता ती विसरून त्यांनी भाजपाला प्रस्तावासाठी 15 दिवसांची मुदत दिलीय. म्हणजेच, युतीसाठी आपण तयार असल्याचे संकेत, किंबहुना 'ऑफर'च दिलीय. त्यामुळे शिवसेनेचा स्वाभिमानी बाणा कुठे हरवला, असा प्रश्न येण्यात गैर काहीच नाही. पण, शिवसेनेनं नमतं का घेतलंय, दोन पावलं मागे येण्याचं का ठरवलंय, याचं कारण तुम्हाला कळलं तर त्यांच्याबद्दल तुम्हाला वाटणारा आदर प्रचंड वाढेल. आम्हाला जेव्हा ते कळलं तेव्हा आम्ही सद्गदितच झालो, पार गहिवरून गेलो. भाजपासोबत सत्तेत सहभागी असतानाही, शिवसेना - त्यांचे नेते रोज न चुकता पंतप्रधान नरेंद्र - देवेंद्रांवर टीका करत होते. जणू त्यांनी ते व्रत म्हणूनच अंगिकारलं होतं. अर्थात, मित्रही 'शत प्रतिशत' पोहोचलेला होता. 'छोटा भाऊ' म्हणून डिवचत होता, कुरघोडीची संधी सोडत नव्हता. पण, सेनेचे बाण जरा अधिकच टोचणारे होते. अयोध्येची स्वारी आणि पंढरीची वारी करून उद्धव यांनी मोठा 'स्ट्राइक'च केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ते चोर म्हणाले, तेव्हा तर युती तुटल्याचं जवळपास पक्कंच मानलं जात होतं. पण, 'मोठा भाऊ' म्हणून मिरवणारी भाजपा थोडी जमिनीवर आली होती. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड हे गड हातचे गेल्यानं, हात मिळवण्याशिवाय पर्याय नाही याची जाणीव नेत्यांना झाली होती. ठेच लागल्यावर आई आठवते, तशी त्यांना 'मातोश्री' आठवली होती. त्यांच्या या हतबलतेमुळे शिवसेनेला स्फुरण चढलं होतं. 'अब आया ऊंट पहाड के नीचे', असं म्हणत चार वर्षांचं उट्टं फेडण्याचा चंगच त्यांनी बांधला होता आणि 'रोखठोक' लेखणी तळपू लागली होती. स्वबळाचा नारा अधिकच बुलंद झाला होता. शिवसेना दबावतंत्र वापरत असल्याचं राजकीय जाणकार म्हणत होते. भाजपाला युतीची गरज असल्यानं त्यांना खिंडीत गाठायची खेळी शिवसेना करत असल्याची चर्चा होती. यामुळे भाजपाचीही जरा 'सटकली'च. रागाच्या भरात त्यांनी शिवसेनेला पटकण्याची 'शाही' धमकी दिली. त्यावरून पुन्हा वाक्-युद्ध रंगलं. अंगावर-शिंगावर, शिवरायांचे मावळे, बाप बाप असतो वगैरे आवाssज घुमला. पुन्हा युती तुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चिन्हं दिसू लागली. परंतु, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीला, झालं गेलं अरबी समुद्राला अर्पण करून, उद्धव ठाकरे यांनी भाजपाला एक 'चान्स' देऊ केलाय. ही संधी गमवायला भाजपा काही हार्दिक पांड्या नाही. स्वबळावरून माघार घेतल्यास शिवसेनेची टिंगल होईल, याचीही उद्धव ठाकरेंना कल्पना आहे. म्हणूनच, जे काही उत्तर द्यायचं ते मी देईन, असं त्यांनी आपल्या शिलेदारांना सांगितलंय. त्यांचं हे उत्तर आम्हाला कळलंय. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठीच शिवसेना भाजपासोबत युतीचा निर्णय घेणार आहे. आहे ना हा उदात्त विचार? जनमत चाचण्यांचे निष्कर्ष वगैरे पाहून नाही, तर जनतेच्या कल्याणासाठी हे दोन मित्र एकत्र येणार आहेत. तुम्ही करा हवं तर टिंगल, पण एवढा त्याग सोपा नाही. आजच्या स्वार्थी जगात इतकी निरपेक्ष, निरलस वृत्ती पाहायला मिळत नाही राव. हॅट्स ऑफ टू UT! 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर, भाजपाला बहुमतासाठी काही जागा कमी पडल्या, तेव्हाही महाराष्ट्राच्या हितासाठीच शिवसेनेनं भाजपाला मदतीचा हात दिला होता. आता संसार म्हटला की भांड्याला भांडं लागणारच ना? पण भांडणाने प्रेम वाढतं, तसंच या दोघांचं झालंय. त्यांचं हे प्रेम घरचे (महाराष्ट्रवासी) स्वीकारतात का, हे बघावं लागेल.टॅग्स :लोकसभा निवडणूक २०१९शिवसेनाभाजपादेवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरेLok Sabha Election 2019Shiv SenaBJPDevendra FadnavisUddhav Thackeray