लढाऊ हेलिकॉप्टरचा थरार; नाशिकच्या 'कॅट्स'मधून 32 लढाऊ हेलिकॉप्टर पायलट देशसेवेत! By अझहर शेख | Published: December 1, 2022 03:27 PM 2022-12-01T15:27:48+5:30 2022-12-01T15:43:01+5:30
नाशिक : कॅट्सच्या आर्मी एव्हिएशन तळावर आयोजित केलेल्या एका समारंभात वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षणार्थींना विंग्ज, बॅज, स्मृतिचिन्ह 57 अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले. सर्व फोटो - प्रशांत खरोटे गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅट्स) प्रशिक्षणार्थी वैमानिकांच्या 38व्या तुकडीचे 32 वैमानिक आज देशसेवेत दाखल झाले. तसेच वैमानिक प्रशिक्षकांच्या 37व्या तुकडीतील सात प्रशिक्षकसुद्धा कॅट्समधून घडले. त्यांचा दीक्षांत सोहळा गुरुवारी (दि.१) उगवत्या दिनकराच्या साक्षीने लष्करी बॅण्ड पथकाच्या देशभक्तीपर गीतांच्या तालावर उत्साहात पार पडला.
अठरा आठवड्यांचे लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांचे प्रशिक्षण, 22 आठवड्यांचे हेलिकॉप्टर वैमानिक प्रशिक्षक आणि 23 आठवड्यांचे प्राथमिक रिमोट उड्डाण एअरक्राफ्ट सिस्टिमचे (इंटर्नल पायलट आणि ऑब्झर्व्हर) प्रशिक्षण अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या एकूण 57 अधिकाऱ्यांनी दिमाखदार संचलन केले.
कॅट्सच्या आर्मी एव्हिएशन तळावर आयोजित केलेल्या एका समारंभात वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षणार्थींना विंग्ज, बॅज, स्मृतिचिन्ह 57 अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी आर्मी एव्हीएशन कोर चे महानिर्देशक व कर्नल कमांडन्ट लेफ्टनंट जनरल अजय कुमार सुरी हे उपस्थित होते. कॅट्सचे कमांडन्ट ब्रिगेडियर संजय वढेरा, उप कामांडन्ट कर्नल डी.के. चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावर्षीच्या पदवीदान सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे प्रशिक्षणार्थ्यांच्या तुकडीत चार महिला आधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये तीन महिलांनी ड्रोन उड्डाणाचे विशेष प्रशिक्षण घेतले आहे. तसेच आणखी एक विशेष बाब म्हणजे यावर्षी एक नायजेरियन सैनिकाचाही प्रशिक्षणार्थी वैमानिकांच्या तुकडीत समावेश आहे. त्यांनादेखील वैमानिकाचे धडे भारतीय प्रशिक्षणार्थ्यांसोबत गिरवले.
या सोहळ्यात 32 प्रशिक्षणार्थी आधिकाऱ्यांच्या चमूने लढाऊ वैमानिकाचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांना मान्यवर लष्करी अधिकारी यांनी एव्हीएशन विंग्स प्रदान करण्यात आले. सात एव्हीएशन हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर आणि बेसिक रिमोटली पायलेटेड एअरक्राफ्ट सिस्टीम चे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 18 अधिकाऱ्यांना विंग प्रदान करण्यात आले. अशा एकूण 57 आधिकाऱ्यांचा गौरव केला गेला.
वैमानिकांच्या तुकडीतील प्रशिक्षणार्थी कॅप्टन नमन बन्सल यांना अष्टपैलू कामगिरीसाठी 'सिल्वर चित्ता' देऊन गौरविण्यात आले. तसेच मेजर अभिमन्यू गनाचारी यांना मेजर प्रदीप अग्रवाल स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. मेजर नवनीत जोशी आणि लेफ्टनंट कर्नल पुनीत नागर यांना अनुक्रमे ब्रिगेडियर के.वी शांडील व एस.एम स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
चित्तथरारक हवाई कसरती; लढाऊ हेलिकॉप्टरचा थरार - चित्त थरारक हवाई कसरतींमध्ये 'रुद्र' ने लक्ष वेधले. पदवी प्रदान सोहळ्यात प्रशिक्षणार्थी जवानांना विंग्स प्रदान केल्यानंतर येथील लष्करी तळावर सादर करण्यात आलेल्या चित्तथरारक हवाई कसरतीमध्ये चित्ता, चेतक, ध्रुव या हेलिकॉप्टर सोबतच रुद्र या अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टरनेही सहभाग घेतला.
यावेळी सादर करण्यात आलेल्या चित्त ठारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचा थरकाप उडविला. तसेच युद्धभूमीवरील सैनिकांना हवाई दलामार्फत लढाऊ वैमानिकांकडून कशाप्रकारे आपत्कालीन मदत दिली जाते, याचेही प्रात्यक्षिक यावेळी सादर करण्यात आले...!