- डॉ़ अनुराधा सहस्रबुद्धे(लेखिका पुणे चाइल्डलाइनच्या कार्यकारी संचालक आहेत.) बंडखोरी करून घरातून पळून गेलेल्या मुला-मुलींचं आणि तरुण जोडप्यांचं पुढे काय होतं? :सिनेमापेक्षा ‘भयानक’ वास्तवाचं चित्र.. घर सोडून, घरच्यांना सोडून, प्रेमापोटी, वैतागापोटी, बंडखोरी करत पळत सुटलेल्या अल्पवयीन मुलामुलांच्या वाटय़ाला नक्की येतं काय? गेल्या वर्षी म्हणजेच 2015 मध्ये पुणे पोलिसांकडे 403 मुली व 228 मुलं घर सोडून गेल्याच्या, हरवल्याच्या तक्रारी नोंदल्या गेल्या आहेत. 2016 मध्ये आत्तापर्यंत (म्हणजे जून अखेरीस) 33 मुलं व 238 मुली हरवल्याच्या तक्रारी मिळाल्या आहेत. त्यात अल्पवयीन मुलामुलींचाही समावेश आहे.***गेल्या दोन वर्षात अहमदनगर जिल्ह्यात 310 मुलंमुली घरातून पळून गेल्याची नोंद अहमदनगर पोलिसांकडे आहे. आधी बेपत्ता म्हणून तक्रार, नंतर अपहरणाचा गुन्हा. आणि काही दिवसांनी तीच मुलं रजिस्टर लग्न केल्याचा पुरावा घेऊन पालकांसमोर हजर होतात अशाही घटना सर्रास घडत आहेत.***कायद्यानं सज्ञान असलेले मुलंमुली घरच्यांच्या विरोधाची अगर संमतीची पर्वा न करता रीतसर लग्न तरी करू शकतात. मात्र अल्पवयीन मुलामुलींचं काय?12 ते 18 या वयोगटात असलेल्या, कायद्यानं अल्पवयीन असलेल्या मुलामुलींचंही प्रेमात ‘हरवून’ घरातून पळण्याचं प्रमाण वाढतं आहे, असं पुण्याच्या चाइल्डलाइन या हेल्पलाइनचं म्हणणं आहे.फिल्मी स्वप्नरंजन, घरातून पळण्याचा थरार, घरच्यांच्या विरोधात बंड, सिनेमात काम करण्याची हौस, स्वतंत्र जगण्याची अनावर ऊर्मी यासह प्रेमात पडून साथ जीने की कस्मे खाण्याचे इरादे या सा:या कारणांसह अडनिडय़ा वयातले हे मुलंमुली घरातून पळतात तेव्हा त्यांचं काय होतं पुढे?फिल्मी संघर्षाच्या पलीकडे जाऊन जेव्हा वास्तवाचे अंगारे त्यांच्या वाटय़ाला येतात तेव्हा ते चटके किती जीवघेणे असतील, असतात हे पळून जाण्यापूर्वी माहिती असतं का? असे अनेक प्रश्न आणि त्यांच्या उत्तरांची दिशा शोधण्याचा एक प्रयत्न पान वय वर्षे 12 ते 18 च्या दरम्यान.वयात येण्याचं, पण अडनिडंच वय.कायद्यानं तर अज्ञानीच. अल्पवयीन.अशा मुला-मुलींचं घरातून पळण्याचं प्रमाण वाढतंय.प्रेम, मनासारखं जगण्याची बंडखोरी या कारणांसह फिल्मी स्वप्नरंजनात हरवताहेत का ही मुलं? चाइल्डलाइन ही अडचणीत सापडलेल्या मुलांसाठी काम करणारी केंद्र सरकारची स्वयंसेवी संस्थांमार्फत राबवली जाणारी योजना आह़े पुण्यात ज्ञानदेवी संस्थेतर्फे ही हेल्पलाइन चालवण्यात येत़े या संस्थेत काम करताना रोज मुलांचे अनेक प्रश्न दिसतात. अनेकविध कारणांसाठी मुलं आणि त्यांचे पालकही आपल्या मुलांसाठी आमच्या हेल्पलाइनकडे मदत मागतात. वयात येणारी ही मुलं. काही पौगंडावस्थेतीलही. हे मुलंमुली शारीरिक व भावनिक संक्रमणावस्थेत असतात़ मनात, शरीरात जे बदल घडत असतात त्याची माहिती तर अपुरी असतेच, पण नेमक्या याच काळातल्या अपु:या आधारामुळे अनेकजण प्रचंड संभ्रमावस्थेतही असतात. प्रश्न साधारण काहीसे कॉमन दिसतात. प्रेमप्रकरणं, शारीरिक आकर्षण, त्यात फसणं, त्यातून निर्माण होणारे ब्लॅकमेलिंगसारखे प्रश्न, शारीरिक बदलांमुळे घाबरून जाणं, धास्ती वाटणं, बोलायला कुणीच नसणं, कुणी समजून घेत नाही असं वाटणं किंवा ‘हा सारा समाज आमच्याविरुद्ध आहे’ अशी पक्की भावना असणं असे अनेकविध प्रश्न घेऊन अनेकजण चाइल्डलाइनला फोन करून सल्ला मागतात़ काय करू विचारतात. आपल्या कहाण्या, आपबिती सविस्तर सांगतात. 12 ते 18 वर्षे वयार्पयतची ही मुलंमुली. त्यांच्या मनात अनेक प्रश्नांची गर्दी असते, आणि ते प्रश्न त्यांना असह्य छळत असतात. कधीकधी आपापल्या मुलांचे असेच प्रश्न घेऊन काही मुलांचे पालक विविध समस्यांबाबत चाइल्डलाइनकडे मदत मागतात. प्रेमप्रकरण, त्यापायी किंवा अन्य कारणांमुळे घरातून पळून जाणं हे काही चाइल्डलाइनला नवीन नाही़ परंतु अचानक गेल्या काही दिवसांत घरातून पळून गेलेल्या मुलांच्या केसेस जास्त प्रमाणात पुढे यायला लागल्या आहेत. वयात येणा:या, घरातून पळालेल्या, पळू पाहणा:या किंवा तशी मनात इच्छा असणा:या अनेकांशी नित्य संवाद आमचा होतो. त्यातून या पळून जाणा:या मुलांच्या संदर्भातली काही निरीक्षणं मांडते आहे.प्रेम, प्रेमाला विरोध, विरोधाची शक्यता आणि घरातली बंडखोरी या कारणांसह घरातून ही मुलं का पळत असतील? झालंय तरी काय मुलांना? समाजाचं काही चुकतं आहे की वेडय़ा वयामुळे या घटना वाढत्या प्रमाणात घडत आहेंत? आर्थिक बाबी तर यामागे नाहीत? ‘पळून जाण्याला’ असलेल्या आणि मुलांना वाटणा:या आकर्षणापलीकडे जाऊन या सर्व गोष्टींचा ऊहापोह करणं हे गरजेचं आह़े वयात येणाच्या वयातल्या, पौगंडावस्थेतल्या मुलामुलींना एकमेकांबद्दल आकर्षण वाटणं स्वाभाविक आह़े वयात येताना संप्रेरकाची प्रचंड उलथापालथ शरीरात होत़े यामुळे भावनिक बदल होतात़ भिन्नलिंगी व्यक्तीचं आकर्षण वाटणं, त्या व्यक्तीस स्पर्श करावासा वाटणं, स्वत:च्या शरीराची नव्यानं जाणीव होणं हा सारा वयात येण्याच्याच प्रक्रियेचा एक भाग आहे. यात अनैसर्गिक असं काही नाही. मात्र हे सारं शरीर आणि मनाच्या बाबतीत घडत असताना, दुसरीकडे चित्रपट, दूरदर्शन मालिका, कादंब-या, मित्र परिवार या सा:या ‘घडामोडीत’ आणि ‘बदल-जाणिवांत’ अधिक रंग भरत जातात. एक तरल मनोवस्था असते जी या बाह्यरंगाने गहिरी होत जात़े अतिशय नाजूक असा हा काळ असतोच. काहींच्या संदर्भात तो अधिक जलदतेने जास्त गुंतागुंतीचा होत जातो. त्याचबरोबर सामाजिक कारणांनी तोल जाणंही अधिक सहज होतं. काही घरात वयात येणा:या मुलींची (प्रामुख्याने स्त्री म्हणून) सातत्यानं झालेली अवहेलना, मुलगी म्हणून अनेक आवडींना घातलेली मुरड आणि सततच्या दुस्वासामुळे न भागलेली प्रेमाची, मायेची भूक ही कारणं मनाच्या तळाशी ठाम आणि पक्की असतात. ओढ या प्रेमाची आणि स्वत:च्या मनाप्रमाणं जगून पाहण्याचीही असतेच असते. त्यात लैंगिक शिक्षणाचा अभाव किंवा काहींना चुकीची लैंगिक माहितीही मिळते. त्यात लैंगिक शिक्षण, शारीरिक आकर्षण, ओढ, ‘त्या’ विषयातलं कुतूहल या सा-याच संदर्भात आपल्याकडे घरोघर आणि एकूण समाजातही एक ‘गप्प बसा संस्कृती’ दिसते. ते विषय बोलण्यावरच बंदी. एकीकडे कुणाशी बोलता येत नाही, दुसरीकडे या मानसिक-शारीरिक ओढीवर ताबा मिळवणं मुलामुलींना फारच जड जातं.या वयाचा आणखी एक स्थायीभाव म्हणजे विद्रोह़ त्यामुळे नियम मोडणं, सामाजिक मान्यतेच्या विरोधात जाऊन, बंडखोरी करून काहीतरी करणं यात मुलामुलींना एक विशेष थ्रिल वाटतं.या सर्वाचा परिपाक म्हणून पळून जाणं, पळून जाऊन लग्न करणं, आपल्या मनासारखं जगण्याची बंडखोरी करणं असे प्रकार वाढत्या प्रमाणात दिसून येत आहेत.आमच्या चाइल्डलाइनकडे अशा केसेस नित्य येत असतात. काही मुली/मुलं पळून जायच्या आधी संपर्कात येतात़ तशाच काही फसल्या/फसवल्या गेलेल्या मुलीही मदत मागतात. चाइल्डलाइनचा असा अनुभव आहे की, अशा पळून जाणा:या मुलामुलींचं प्रमाण सध्या वाढत आह़े सैराटसारख्या चित्रपटांचा परिणाम असावा का? असा प्रश्नही हे आकडे आणि आमच्याकडे मदत मागणा:या मुलामुलींच्या कहाण्या ऐकून मनात येतोच. मुलामुलींच्या मनातला मुळातला विद्रोह, थ्रिलची भूक, लग्न या संस्थेबद्दलच्या अनेक परिकल्पना (फॅण्टसीज्) या सा:याला अशा चित्रपटांनी चेतना मिळते का? - असा प्रश्नही मग समोर उभा राहतो.सुमारे तीन दशकांपूर्वी ‘एक दुजे के लिये’ हा सिनेमा आणि त्याची अन्य भाषिक रूपांतरं खूप गाजली़ त्या सुमारास प्रेमात असलेल्यांचे जोडीनं आत्महत्त्या करण्याचे पेव फुटले होत़े तसाच तर प्रकार नसावा? मागच्या एकाच आठवडय़ात, खरंतर तीन दिवसात अशा चार केसेस एकटय़ा पुणे चाइल्डलाइनकडे आल्या आहेत. आणि चारही जोडपी प्रेमप्रकरणातून पळून गेल्याचं समजलं आहे. पोलिसांचा अनुभवही यापेक्षा वेगळा नाही.या घटना पाहिल्या की एक प्रश्न पडतो की, अशा रीतीनं पळून जाणारी ही मुलं खरंच अजून ‘लहानच’ असतात की तद्दन फिल्मी अशीच त्यांची ही वर्तणूक असते. काही वर्षापूर्वी अशा 12 ते 15 वयोगटातील तीन जोडय़ा एका बाईंना स्टेशनवर आढळल्या़ त्यांनी त्यांना आमच्याकडं पाठवलं. दोन दिवसांपासून उपाशी होती ती मुलं. हाताशी काहीच नव्हतं. पूर्ण निराधार. वयही सज्ञान नाही. अल्पवयीनच.मात्र तरीही ते घरातून पळाले होते.आणि पळाल्यावर त्यांच्या वाटय़ाला आले हे उपास.खरंतर ऊनवा:याची पर्वा न करता रस्त्यावर राहणं, काम शोधून जगण्याची व मैत्रिणीला जगवण्याची स्वप्नं पाहणं, सपनोंका घर बनवणं हे सारं सिनेमातून आलेल्या प्रेमाच्या चित्रतलं असतं, याची त्यांना कल्पनाही नव्हती.या मुलांशी बोललं. जरा मोकळेपणी बोलायला लागल्यावर ही मुलं म्हणाली, आम्हाला काहीतरी काम द्या. म्हणजे आम्ही या मुलींना पोसतो. आमचं आम्ही जगतो. काही वेळानं त्यांना जेवायला दिलं तर अत्यंत फिल्मी पद्धतीनं मुली मुलांची जेवणं झाल्यावर जेवल्या. त्यांनी त्यांची ताटे उचलून धुवून आणली. एकदम सिनेमात असतात तशा हिरोईन्ससारख्या या मुली वागत होत्या. पूर्ण वेगळीच स्वप्न पाहत होत्या, ज्यांना वास्तवाचा काही आधार नव्हता. पण त्या मात्र प्रत्यक्ष जगण्यात फिल्मी हिरोईनसदृश प्रकार करत होत्या.आणखी एक मुलगी हेल्पलाइनकडे मदत मागायला आली. नवरा दुसरं लग्न करणार आहे तेव्हा मदत करा असं ती म्हणत होती. पण तुझं लग्न कधी झालं, कसं झालं विचारलं तर तिने जे सांगितलं ते ऐकून धक्काच बसला. मुळात हिचं लग्न ‘मांग में सिंदूर डाला’ नंतर लॉजवर हनिमून असं झालं होतं. ना कुणी साक्षीदार, ना लग्न रजिस्टर काहीच नाही. दो चुटकी सिंदूर त्यानं हिच्या ‘मांग मे’ भरला नी झालं लग्न . आता तो तसंच दुसरीशी लग्न करतोय. हे प्रकार तर सर्रास. अनेक मुली इतर राज्यातून आलेल्या विशेषत: गरीब घरातल्या असतात. परिस्थितीने व मुलगी म्हणून पीडित असतात. लग्न म्हणजे त्यांना त्या परिस्थितीतून सुटका आणि एक प्रकारची स्वप्नपूर्ती वाटते.आणि त्या सुटकेसाठी, स्वप्नासाठी आपण सुटलोय, स्वतंत्र झालोय या भ्रमात त्या पळून येतात. दुर्दैव असं की, त्यातल्या काही वेश्याव्यवसायातही ढकलल्या जातात.अशी किती उदाहरणं सांगता येतील, पळून गेलेल्यांच्या हालअपेष्टांची, स्वप्न आणि वास्तव यात गल्लत केल्याची, अल्पवयीन असताना झालेल्या परवडीची आणि वाताहतीची!अल्पवयातली, कायद्यानं सज्ञान नसलेल्या या मुलांनी घरातून पळताना ‘फिल्मी’ नजरेनं विचार न करता, जरा वास्तवाचाही हात धरावा. ज्यांच्यावर विश्वास त्यांचा सल्ला घ्यावा. बोलावं. पळून जाऊन प्रश्न सुटतात, असं काही नाही!प्रेमात पडून पळून जाण्यापेक्षा. * प्रेमात पडलेल्यांना पळून जावंसं वाटतं कारण त्यांना योग्य माहिती, आधार मिळत नाही. अडनिडय़ा वयातल्या, पौगंडावस्थेतल्या या मुलांचं योग्य माहिती आणि लैंगिक शिक्षण देऊन सगळ्यासाठी सबलीकरण करणं हा एकच मार्ग उपायस्वरूप यशस्वी होण्याची शक्यता दिसते.* शारिरीक बदल दाखवणारे व भावनिक बदलांची जाणीव करून देणारे लैंगिक शिक्षण अत्यंत गरजेचं आह़े यात लिंगभाव, लैंगिकता व लैंगिक जीवनाचे शिक्षण पण गरजेचं आह़े * भावना कशामुळे उद्दिपीत होतात व त्यावर ताबा कसा व का मिळवायचा हे या वयात समजणंही गरजेचं आहे. जबाबदार लैंगिक संबंधाची माहिती असणं, म्हणजे काय याची शास्त्रोक्त माहिती मिळणंही आवश्यक आहे. * बेजबाबदार लैंगिक संबंधातून उद्भवणारे प्रश्न, जसे की गर्भारपण, दिवस जाणो, ब्लॅकमेलिंगसाठी शरीरसंबंधांचे चित्रीकरण व गैरवापर केला जाणं यांसह भावनिक, मानसिक समस्याही निर्माण होऊ शकतात.* आपल्या वारंवार उद्दिपीत होणा:या भावनांना आवर न घातल्यास होणारे दुष्परिणाम पण मुलांना कळले पाहिजेत़ छंदांचा यासाठी उपयोग होऊ शकतो़ या वयात झोकून देऊन काम करण्याची वृत्ती असत़े या स्वाभाविक बाबीचा सकारात्मक उपयोग करत पौगंडावस्थेतील अतिरिक्त ताकदीला दिशा देणं सहज शक्य आह़े मात्र त्यासाठी पालकांनीही सजग प्रयत्न करायला हवेत. प्रेमात हरवल्यानं बेपत्ता होणा-यांचं प्रमाण 60 टक्के * पुणे चाइल्डलाइनकडे गेल्या सहा महिन्यातच पळून गेलेल्या मुलांच्या नऊ केसेस देण्यात आल्या़ त्यात प्रेमासाठी लग्नासाठी पळून गेलेल्यांमध्ये पाच मुली व अल्पवयीन एक मुलगा होता. यातील एकच जोडपे सापडले, इतर अजूनही बेपत्ता आहेत़ * पुणो पोलिसांना 2015 मध्ये 403 मुली व 228 मुले, तर 2016 मध्ये आत्तापर्यंत (म्हणजे जून अखेरीस) 33 मुलं व 238 मुली हरवल्याच्या तक्रारी मिळाल्या आहेत. * पोलिसांचाही अनुभव असाच आहे की यापैकी 60 टक्के मुलं बेपत्ता होण्यात प्रेमप्रकरणातील ‘हरवणं’ असू शकतं. अर्थात या आकडेवारीसह या विषयाचाच अधिक सखोल व प्रत्यक्ष अभ्यास करण्याची गरज आहे.पालकांनी समंजस व्हावं. लग्न या संस्थेचा खरा अर्थ, त्यासाठी शरीराची, मनाची व आर्थिक तयारीही आवश्यक असते याची जाणीव मुलांना करून द्यायला हवी.हेही सांगायला हवं की, या वयात भिन्नलिंगी आकर्षण वाटणं स्वाभाविक आह़े बिनधास्त उडी घेऊ, बेधडक काहीही करू, मनात येईल ते करू असा विद्रोही आवेशही चुकीचा नाही. पण जे करू त्या परिणामांची जाणीव हवी़ निर्णय ज्याचा-त्याचा हे स्वातंत्र्यही मुलांना हवं. पण ते देताना स्वत:ची लक्ष्मणरेषा स्वत:च आखायची असते. ती सुरक्षित असावी याची काळजी घ्यावी लागते याचं भानही द्यायलाच हवं.आणि हे सारं करूनही जर ती लक्ष्मणरेषा ओलांडल्यामुळे अपघात झालाच तर जखमी पिलाला आधारासाठी आश्वस्त करणं हेही मोठय़ांचंच काम. अनेकदा घरचे आपल्याला स्वीकारतील का याचीही भीती मुलांना छळत असतेच! 1098 तुम्ही कुठल्याही शहरात राहात असाल आणि चाईल्डलाइनशी संपर्क करायचा असेल तर 1098 हा टोल फ्री क्रमांक डायल करा. अधिक माहिती, सल्ला, मार्गदर्शन आणि स्थानिक संस्थेशी संपर्काची माहिती या क्रमांकावर मिळू शकते.