शहरात ८० कोटींचे नुकसान : परमिट रूमवाल्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 02:12 AM2017-09-08T02:12:02+5:302017-09-08T02:12:07+5:30
राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून पाचशे मीटर अंतरावरील परमिट रूम, मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला.
पिंपरी : राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून पाचशे मीटर अंतरावरील परमिट रूम, मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. तेव्हापासून अद्यापपर्यंत तब्बल पाच महिने शहरातील सुमारे ३५० मद्यविक्रीची दुकाने, परमिट रूमची व्यवस्था असलेली सुमारे ७९ हॉटेल बंद ठेवण्यात आली होती. हा आदेश महापालिका हद्दीपुरता शिथिल करण्यात आला असून, बुधवारी रात्रीपासून परमिट रूम, मद्यविक्रीची दुकाने खुली झाली. गेल्या पाच महिन्यांत परमिट रूम बंद असल्याने हॉटेल व्यवसायावर विपरीत परिणाम जाणवला. सुमारे ८० कोटींहून अधिक नुकसान झाल्याचे हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर दुतर्फा मानवी पावलांच्या पाचशे मीटर अंतरावर असलेल्या मद्यविक्री बंदीचा आदेश महापालिका हद्दीपुरता शिथिल करण्यात आला आहे. त्यानुसार पालिकेच्या हद्दीतून जाणारे राष्ट्रीय व राज्य महामार्गांलगतची मद्यविक्री दुकाने, हॉटेल, परमिट रूम पूर्ववत सुरू करण्याची मुभा मिळताच, हॉटेल व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले. शहरातील ३५० हून अधिक मद्यविक्रीची दुकाने, हॉटेल आणि परमिट रूम बार बुधवारपासून सुरू झाले. न्यायालयाच्या निर्णयामुळे महामार्गालगतच्या परमिट रूम, हॉटेल बंद ठेवण्यात आली होती. परमिट रूम बंद असल्याने संबंधित हॉटेलमधील ग्राहकांच्या संख्येत घट झाली होती.
ग्राहकांना सवलतीचे आमिष
४महामार्गालगतच्या परिसरात वर्षानुवर्षे हॉटेल व्यवसाय करणाºयांवर या निर्णयामुळे संकट ओढवले होते. ग्राहकांनी पाठ फिरविल्याने काही हॉटेल व्यावसायिकांनी जेवणाच्या बिलावर २५ टक्के सूट अशा सवलतीच्या योजना जाहीर केल्या होत्या. तरीही त्यांना अक्षरश: ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागत होती. नोटाबंदी, जीएसटी या निर्णयानंतर महामार्गालगत मद्यविक्रीस बंदी घालण्याचा निर्णय झाल्यानंतर हॉटेल व्यावसायिक जेरीस आले होते. पिंपरी-चिंचवड शहराजवळून पुणे-मुंबई, मुंबई-बंगळुरू आणि पुणे-नाशिक महामार्ग जातो. त्यामुळे या परिसरातील सुमारे साडेतीनशे मद्यविक्रीची दुकाने, ७९ परमिट रूम हॉटेल पाच महिन्यांपासून बंद होती. हॉटेल सुरू असली, तरी त्या ठिकाणी मद्यविक्रीस बंदी असल्याने हॉटेलची आर्थिक उलाढाल मंदावली होती.
४हॉटेल व्यावसायिकांना पाच महिन्यांचा कालावधी खूप कठीण गेला आहे. व्यवसाय अगदी २० टक्क्यांवर आल्याने हॉटेल व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले होते. कामगार सांभाळणे, त्यांचा पगार, वीज बिल, तसेच अन्य खर्च सुरूच होता. त्या तुलनेत उत्पन्न मात्र कमालीचे घटले होते. या काळात शहरातील हॉटेल व्यावसायिकांना सुमारे ८० कोटींचा आर्थिक फटका बसला. महापालिका हद्दीतून जाणारे महामार्ग अपवाद राहतील, अशी शिथिलता आणल्याने हॉटेल व्यवसायिकांना दिलासा मिळाला आहे.