अमृतांजन पॉइंट मद्यपींचा अड्डा
By admin | Published: May 9, 2017 03:40 AM2017-05-09T03:40:29+5:302017-05-09T03:40:29+5:30
मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा घाटातील पर्यटकांचे आकर्षणस्थळ असलेला अमृतांजन पॉइंट हा दारुड्यांचा अड्डा बनला असून,
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणावळा : मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा घाटातील पर्यटकांचे आकर्षणस्थळ असलेला अमृतांजन पॉइंट हा दारुड्यांचा अड्डा बनला असून, परिसरात सर्वत्र दारूच्या रिकाम्या बाटल्या व फुटलेल्या बाटल्यांच्या काचांचा खच पडला आहे. त्यामुळे या ठिकाणी उभे राहणेही धोक्याचे बनू लागले आहे. विशेष म्हणजे ब्रिटिश काळात उभारण्यात आलेला अमृतांजन पूल हा हेरिटेज वास्तू म्हणून घोषित झाला आहे.
मुंबई व कोकण परिसरातून जीवघेण्या उष्म्याचा सामना करून घाट चढत लोणावळ्याच्या दिशेने येताना याच ठिकाणी वातावरणात बदल होतो व थंड हवेची झुळूक जिवाला सुखावते. अशा या अमृतांजन पॉइंटवर मोठ्या संख्येने पर्यटक परिवारासमवेत थांबतात. या ठिकाणाहून सह्याद्रीचा उंच सुळका असलेला नागफणी डोंगराचा (ड्युक्स नोज) परिसर, हिरवाईने नटलेली दरी, बोगद्यातून लपंडाव खेळत जाणारी रेल्वे गाडी, खोपोली शहराचा परिसर, खंडाळा घाटातील नागमोडी वळणे पाहायला मिळत असल्याने या विहंगम दृश्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह पर्यटकांना आवरता येत नाही. मात्र, मागील काही दिवसांपासून या ठिकाणाला दारुड्यांची नजर लागली आहे. दुपारच्या वेळी झाडाझुडपाचा आसरा घेत, तर सायंकाळनंतर जागा दिसेल त्या ठिकाणी बसून येथे दारूच्या पार्ट्या झडू लागल्या आहेत. दारू पिऊन झाल्यानंतर ही मंडळी बाटल्या तेथेच फोडत असल्याने परिसरात सर्वत्र काचाचा खच पडला आहे. असे असताना या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेकडून काहीच दखल घेतली जात नाही. त्यामुळे या आकर्षक स्थळावर दारूड्यांचा वावर वाढतच आहे.