... अन् भिंती देऊ लागल्या स्वच्छतेचा संदेश, कलाकारांनी चित्रांतून दिला स्वच्छतेचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 03:17 AM2018-01-07T03:17:46+5:302018-01-07T03:18:05+5:30
शहरात स्वच्छ सर्वेक्षण २०१८ला दोन महिन्यांपूर्वी सुरुवात झाली. लोणावळा नगर परिषदेच्या हाकेला साद देत येथील स्थानिक कलाकारांनी सेवातत्त्वावर भिंती रंगविण्याचे काम केल्याने त्यांच्या कुंचल्यातून निर्माण झालेली स्वच्छतेची चित्रे व संदेश यामुळे आता भिंतीच नागरिकांना व पर्यटकांना स्वच्छतेबाबत संदेश देत आहेत.
लोणावळा : शहरात स्वच्छ सर्वेक्षण २०१८ला दोन महिन्यांपूर्वी सुरुवात झाली. लोणावळा नगर परिषदेच्या हाकेला साद देत येथील स्थानिक कलाकारांनी सेवातत्त्वावर भिंती रंगविण्याचे काम केल्याने त्यांच्या कुंचल्यातून निर्माण झालेली स्वच्छतेची चित्रे व संदेश यामुळे आता भिंतीच नागरिकांना व पर्यटकांना स्वच्छतेबाबत संदेश देत आहेत.
लोणावळा शहर १०० टक्के स्वच्छ व कचरामुक्त करणे हे प्रशासनाकरिता आव्हानात्मक आहे. मात्र, हे शिवधनुष्य पेलत शहराला केवळ नामांकन मिळावे म्हणून नाही, तर शहर खºया अर्थाने स्वच्छ व सुंदर बनावे याकरिता नगर परिषदेकडून दैनंदिन स्वच्छतेच्या कामासोबत काही नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमांना नगर परिषद कर्मचारी व अधिकारी, नागरिक, कलाकार, संस्था, तसेच शाळांचे शिक्षक व विद्यार्थी या सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने स्वच्छ सर्वेक्षणाची मोहीम ही लोणावळेकरांची मोहीम होऊन बसली आहे.
नागरिकांचा प्रतिसाद व सकारात्मकता ही सर्वेक्षणांच्या मानांकनापेक्षा मोठी व कायमस्वरूपाची असल्याची भावना नगराध्यक्षा सुरेखा जाधव व मुख्याधिकारी सचिन पवार यांनी व्यक्त केली आहे.
लोणावळा रेल्वे स्थानकावर रंगविलेल्या भिंतींच्या धर्तीवर शहरातील मुख्य भिंती रंगविल्यास त्या उद्बोधक ठरतील अशी कल्पना उदयास आली. मात्र, ती प्रत्यक्षात उतरविण्याकरिता मोठा खर्च अपेक्षित असल्याने नव्याने निर्माण झालेले संकट सोडविण्याचे महत्त्वाचे कार्य शहरातील चित्रकार मंडळींनी केले. कसलाही मोबदला न घेता दर शनिवार व रविवार सेवा तत्त्वावर शहराकरिता वेळ देण्याचे लहान-मोठ्या सर्व कलाकार मंडळींनी मान्य केले.
भिंती रंगविण्याच्या मोहिमेकरिता लागणारा रंग व इतर साहित्य देखील काही दानशूर मंडळींनी उपलब्ध करून दिल्याने मागील दीड महिन्यापासून नगर परिषदेचा एक रुपयाही यासाठी खर्च झालेला नाही. शहरातील नांगरगाव, वलवण, खंडाळा सनसेट व इतर भागात देखील यापुढील काळात भिंती रंगविण्याचे काम करीत जनजागृती कायम ठेवण्याचा मानस कलाकार मंडळींनी व्यक्त केला आहे.