खासगी सहभागातून दुग्धव्यवसाय वाढविण्याचे प्रयत्न; महादेव जानकर यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 05:34 PM2017-10-26T17:34:30+5:302017-10-26T17:40:17+5:30
राष्ट्रीय समाज पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणीच्या पदाधिकार्यांच्या बैठकीच्या निमित्ताने ते शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पिंपरी : आगामी काळात अन्न प्रक्रिया उद्योगाला महत्व येणार आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसायास चालना देणे महत्त्वाचे ठरेल. शेतकर्यांचे उत्पन्न वाढू शकेल. या दृष्टीने शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी बीओटी तत्वाचा अवलंब करून खासगी संस्थांचा सहभाग घेण्यात आला आहे, असे मत दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणीच्या पदाधिकार्यांच्या बैठकीच्या निमित्ताने ते शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आगामी काळ अन्न पदार्थ प्रक्रिया उद्योगासाठी पूरक असा आहे. शेतकर्यांचे उत्पन्न कसे वाढविता येईल. डेअरी व्यवसायाच्या वृद्धीसाठी काय करता येईल, त्यासंदर्भातील माहितीची देवाण-घेवाण करण्याच्या निमित्ताने पुण्याच्या दौर्यांवर आलो होतो. माजी मंत्री राजेश टोपे, महानंदाचे विनायक पाटील, रणजीत निंबाळकर यांच्याबरोबर पुण्यात विविध स्टॉलला भेटी दिल्या. डेअरी व्यवसायाच्या वृद्धीसाठी शासनाने खासगी संस्थांचा सहभाग घेण्याचे धोरण अवलंबले असून त्यामुळे शासनाचे ३ हजार कोटी रुपए वाचणार आहेत. भांडवली गुंतवणूक शासनाऐवजी या संस्थांच करणार आहेत. बांधा, वापरा, हस्तांतरित करा अशाच पद्धतीने काम करावे लागणार आहे. जमिन शासनाच्या मालकीची राहिल, त्या जागेवरील स्टॉल खासगी संस्थांचे असतील. विपणन, विक्री व्यवस्थापन त्यांच्याकडेच राहिल. त्यामुळे शासनाचे त्यात नुकसान होणार नाही. फायदा झाला तर शेतकर्यांचा होईल.