नोटीसनंतरही अवैध बांधकामे न हटविणाऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2018 03:09 PM2018-11-04T15:09:45+5:302018-11-04T15:11:45+5:30
महापालिकेच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे दिघीतील तीन मिळकतधारक आणि भोगवटाधारकांविरूद्ध पोलिसांनी महापालिका प्रांतिक व नगररचना अधिनियमानुसार गुन्हे दाखल केले आहेत.
पिंपरी : अनधिकृत बांधकामे स्वत:हून काढून टाकावीत, असे महापालिकेतर्फे नोटीस दिल्यानंतरही त्याकडे मिळकतधारक दुर्लक्ष करतात. महापालिकेच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे दिघीतील तीन मिळकतधारक आणि भोगवटाधारकांविरूद्ध पोलिसांनी महापालिका प्रांतिक व नगररचना अधिनियमानुसार गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल मनोहर मेटांगे, नम्रता देवेंद्र पाटील, सचिन भिमराव लांडे अशी गुन्हा दाखल झालेल्या मिळकतधारकांची नावे आहेत. त्यांनी गाडगेनगर, डुडुळगाव येथे केलेल्या अनधिकृत बांधकामांविरोधात अनिल देवराम शिंदे (रा. श्रीरामनगर, औंध) यांनी फिर्याद दिली आहे. या मिळकतधारकांनी केलेल्या अनधिकृत बांधकामाची तक्रार शिंदे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली होती. महापालिकेने या मिळकतधारकांना २१ आॅगस्टला नोटीस बजावली होती. १ नोव्हेंबर २०१८ पर्यंत मिळकतधारकांनी स्वत:हून अनधिकृत बांधकामे पाडुन टाकावीत. अशी मुदत नोटीसमध्ये देण्यात आली होती. मुदत संपुष्टात आल्यानंतरही मिळकतधारकांनी अनधिकृत बांधकामे हटवली नाहीत. त्यामुळे या मिळकतधारकांवर दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांनी नोटीस मिळाल्यानंतरही अनधिकृत बांधकाम पाडुन न टाकल्यास पुढील कारवाई होत नव्हती. दिघीतील अनधिकृत बांधकाम प्रकरणी मात्र नोटीसमध्ये दिलेल्या मुदतीत मिळकतधारकांनी अनधिकृत बांधकाम पाडुन न टाकल्याने त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात आली आहे.