देहूरोड दारुगोळा कोठाराचा रेडझोन हटवण्याच्या मागणीसाठी साखळी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 03:31 PM2018-02-12T15:31:40+5:302018-02-12T15:34:11+5:30
रेडझोन संघर्ष समिती, रेडझोन संस्थेच्या पुढाकारातून रेडझोन हटविण्याच्या प्रमुख मागणीसाठी सोमवारी (दि. १२) सकाळी अकरापासून देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयाच्या सीमाभिंतीशेजारी साखळी उपोषणास सुरूवात झाली आहे.
किवळे (पिंपरी चिंचवड) : देहूरोड दारुगोळा कोठाराच्या रेडझोन बाधित १२ गावांतील नागरिकांनी स्थापन केलेल्या रेडझोन संघर्ष समिती, रेडझोन संस्थेच्या पुढाकारातून रेडझोन हटविण्याच्या प्रमुख मागणीसाठी सोमवारी (दि. १२) सकाळी अकरापासून देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयाच्या सीमाभिंतीशेजारी साखळी उपोषणास सुरूवात झाली आहे.
देहूरोड दारुगोळा कोठाराचा रेडझोन किवळे, विकासनगर, चिंचोली, किन्हई, श्रीक्षेत्र देहू, माळवाडी, विठ्ठलवाडी, तळवडे, चिखली, निगडी, मामुर्डी, बोडकेवाडी, शेलारवाडी व झेंडेमळा आदी लागू करण्यात आलेला आहे.
रेडझोन जाहीर झाला असल्याचे नागरिकांना तब्बल दहा वर्षांनी फेब्रुवारी २०१३ मध्ये नकाशा प्रसिद्ध झाल्यानंतर समजले होते. रेडझोनमुळे देहूरोड परिसरातील एकूण बारा गावांतील सुमारे पाच हजार एकर जमीन बाधित झाली आहे. देहूरोड कँटोन्मेंट, पिंपरी चिंचवड महापालिका, प्राधिकरण, आदी भागातील सुमारे ७० हजार मिळकती, ५०० लघुउद्योग, तळवडे आयटी पार्क, महापालिकेचा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, सुमारे ४० हजार कामगार, व साडेतीन लाख नागरिक (लोकसंख्या) अडचणीत आलेले असताना सरकारी पातळीवर रेडझोन प्रश्न सोडविण्याबाबत अनास्था दिसत असून ‘रेडझोन हटाव, घर बचाव’ अशी मागणी करीत जनआंदोलनचा पहिला टप्पा सोमवारपासून साखळी उपोषणद्वारे सुरू करण्यात आला असल्याचे रेडझोन संस्थेचे अध्यक्ष सुदाम तरस यांनी सांगितले.