महापौरांच्या वॉर्डात नागरिक हैराण, मोशी कचरा डेपो, साथीच्या आजारांत वाढ, उघड्यावरही टाकला जातो कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 02:34 AM2017-09-16T02:34:54+5:302017-09-16T02:35:07+5:30
प्रभागात उघड्यावर कच-याचे ढीग, या ढिगातून येणारी दुर्गंधी यामुळे या परिसरात राहणे नागरिकांना मुश्किल झाले आहे. दुर्गंधीमुळे साथीच्या आजारांत वाढ झाली आहे. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करूनही कार्यवाही होत नाही.
मोशी : प्रभागात उघड्यावर कच-याचे ढीग, या ढिगातून येणारी दुर्गंधी यामुळे या परिसरात राहणे नागरिकांना मुश्किल झाले आहे. दुर्गंधीमुळे साथीच्या आजारांत वाढ झाली आहे. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करूनही कार्यवाही होत नाही. विशेषत: म्हणजे ही समस्या स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणा-या महापौर नितीन काळजे यांच्या मोशी प्रभागातील वास्तव आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात १८ वर्षांपूर्वी मोशीचा समावेश झाला. मोशीचा विकास ज्या नियोजन पद्धतीने होणे अपेक्षित होता. मात्र, मोशीकरांच्या माथी संपूर्ण शहरातील कचरा डेपो मारण्यात आला. कच-यांवर संपूर्ण प्रक्रिया करण्यात येणार असल्याने नागरिकांना कोणताही त्रास होणार नसल्याचे आश्वासन देण्यात आले होते.
मात्र, निवडणुकीच्या काळात आणाभाका घेऊन कच-याची समस्या सोडविण्याचे आश्वासन देणारे स्थानिक नगरसेवक व महापौर यांनी पुढे कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. त्यामुळे मोशी येथील कचरा डेपोमुळे परिसरात घाणीचे सम्राज्य व दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले, असून लोकप्रतिनिधीप्रमाणे महापालिका प्रशासनाला याचे कसलेच गांभीर्य नाही.
प्रक्रिया प्रकल्प बंद, विकासाला खीळ
शहरातील दैनंदिन कचरा या डेपोमध्ये आणून त्यावर प्रक्रि या करून विविध प्रक्रिया प्रकल्प उभारले जातील. त्यामुळे स्थानिकांना कोणताही त्रास होणार नसल्याचे आश्वासन दिल्याने रहिवाशांनी कचरा डेपोचा विरोध मागे घेतला होता. मात्र,पालिका प्रशासनाकडून योग्य पद्धतीने कार्यवाही न झाल्याने प्रक्रिया प्रकल्प बंद पडले आहेत. शिवाय या डेपोला संरक्षक भिंतसुद्धा चारही बाजूंनी नसल्यामुळे मोकाट कुत्री डेपोजवळ जमा होतात. त्यानंतर बाहेरील शेतीचे नुकसान करत आहेत. मात्र, प्रशासनाने कचरा डेपोच्या संरक्षक भिंतीचे काम पूर्ण केलेले नाही.
कचरा डेपोच्या दुर्गंधीने परिसरातील नव्याने उभारण्यात येणारे गृहप्रकल्प व विकासाच्या कामांवर परिणाम होत आहे. त्यामुळे परिसराच्या विकासाला खीळ बसली आहे. नवीन प्रकल्प मालकांना कचरा डेपो डोकेदुखी ठरत आहे. शहरातील जवळपास ७५० मेट्रिक टन कचरा या डेपोमध्ये टाकून त्यावर प्रक्रि या करण्याचे नियोजन आहे. मात्र, पूर्वीचे प्रकल्प बंद असल्याने नवीन कचºयाला स्थानिकांचा विरोध आहे. सध्या ही दुर्गंधी मोशीतील बोºहाडेवाडी, पुणे-नाशिक हायवे, हजारे वस्ती, बनकर वस्ती, जांभूळ शेती परिसरात येऊ लागल्यामुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मोशीतील कचरा डेपोवर दैनंदिन ७५० मेट्रिक टन
दिवसभरात आणून टाकला जातो. आणून टाकलेल्या कचºयापैकी ४५० मेट्रिक टन कचºयावर मॅकेनिकल कंपोस्ट,४० टन गांडूळ खत प्रकल्प, दीड ते दोन टन प्लॅस्टिकपासून इंधन निर्मिती प्रकल्प उरलेल्या कचºयाचे सॅनिटरी लॅण्ड डेव्हलपर्सच्या माध्यमातून कचºयाची विल्हेवाट लावली जात असते. वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, राडा रोड्यावर प्रक्रि या करणारा प्रकल्प असे प्रकल्प यापुढे राबवण्यात येणार आहे.
- संजय कुलकर्णी,
कार्यकारी अभियंता,
पर्यावरण