उद्योगनगरीमध्ये ‘धरण उशाला, कोरड घशाला’; पवना धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा असूनही नागरिकांची वणवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 11:18 PM2017-11-11T23:18:46+5:302017-11-11T23:19:03+5:30
यंदाच्या पावसाळ्यात पिंपरी-चिंचवड परिसरासह शहराला पाणीपुरवठा करणा-या पवना धरण क्षेत्रातही भरघोस पाऊस पडला. पवना धरण शंभर टक्के भरल्याने शहरवासीयांच्या पाण्याची चिंता मिटली, असे बोलले जात होते.
- मंगेश पांडे
पिंपरी : यंदाच्या पावसाळ्यात पिंपरी-चिंचवड परिसरासह शहराला पाणीपुरवठा करणाºया पवना धरण क्षेत्रातही भरघोस पाऊस पडला. पवना धरण शंभर टक्के भरल्याने शहरवासीयांच्या पाण्याची चिंता मिटली, असे बोलले जात होते. मात्र, महापालिका प्रशासनाच्या नियोजनाअभावी शहरवासीयांवर उन्हाळ्यापूर्वी नोव्हेंबर महिन्यातच पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. यामुळे ‘धरण उशाला, कोरड घशाला’ अशी स्थिती सध्या शहरात आहे.
पवना धरणात साडेआठ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. याच धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. पावसाळ्यात हे धरण शंभर टक्के भरल्याने शहरवासीयांनीही समाधान व्यक्त केले. सध्यादेखील या धरणात तब्बल ९६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या फुगेवाडीसारख्या परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून पाण्याचा खडखडाट आहे. याकडे पालिका प्रशासनाचेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांवर रस्त्यावर उतरून आंदोलनाची वेळ आली.
धरणात मुबलक पाणीसाठा असताना तसेच पाणीपुरवठ्याच्या यंत्रणेसाठी लाखो रुपये खर्च केले असतानाही नियोजनाचा अभाव आहे.
योग्य नियोजनाचा अभाव
पाणीपुरवठा ही तातडीक सेवा आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांच्या बजेटसह महापालिकेची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. शहरात लोकसंख्येच्या प्रमाणानुसार रावेत येथील बंधाºयातून दररोज लाखो लिटर पाण्याचा उपसा केला जातो. मात्र, त्याचे वितरण करताना योग्य नियोजन केले जात नसल्याने सुरळीत पाणीपुरवठा होत नाही.
कमी दाबाने पाणीपुरवठा
शहराच्या काही भागात गढूळ पाणीपुरवठा होत आहे. यामुळे साथीच्या आजाराने नागरिक हैराण झाले आहेत. अर्धा तासासाठी पाणी सोडले जाते. पाण्याचा दाब कमी असतो. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचे नागरिक सांगतात.
पिंपरी-चिंचवड शहर की दुष्काळी गाव
फुगेवाडीत पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने संतप्त नागरिकांकडून ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. धरणातील मुबलक पाणीसाठा व पाणीवितरणाच्या यंत्रणेसाठी कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाही वेळेत व पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. त्यामुळे शहरातील काही भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. यामुळे हे पिंपरी-चिंचवड शहर आहे की दुष्काळी गाव असा प्रश्न नागरिकांसमोर आहे.