घरासाठीच्या आंदोलनाची पन्नाशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 03:31 AM2017-08-05T03:31:50+5:302017-08-05T03:31:50+5:30
पिंपरी-चिंचवड शहर, तसेच प्राधिकरण हद्दीतील अनधिकृत घरे नियमित होण्यासाठी ‘घर बचाव संघर्ष समिती’ने शहरांत जनजागृती मोहीम सुरू केलेली आहे. घरे वाचविण्यासाठी सुरू झालेल्या रिंगरोड आणि अनधिकृत बाधित रहिवाशांच्या लढ्यास ५० दिवस पूर्ण झाले.
रावेत : पिंपरी-चिंचवड शहर, तसेच प्राधिकरण हद्दीतील अनधिकृत घरे नियमित होण्यासाठी ‘घर बचाव संघर्ष समिती’ने शहरांत जनजागृती मोहीम सुरू केलेली आहे. घरे वाचविण्यासाठी सुरू झालेल्या रिंगरोड आणि अनधिकृत बाधित रहिवाशांच्या लढ्यास ५० दिवस पूर्ण झाले. विविध प्रकारच्या माध्यमांतून नागरिकांनी सदरचे आंदोलन अहिंसा आणि लोकशाहीच्या मार्गाने सुरूच ठेवलेले आहे.
आंदोलनाची पूर्णत: दखल अजूनही प्रशासनाने घेतलेली नाही. दि. २१ जुलै २०१७ रोजी निघालेली ‘प्रारूप नियमावली’सुद्धा (अधिसूचना) नागरिकांना दिलासा देऊ शकलेली नाही. गेल्या ३० वर्षांपासून नवनगर प्राधिकरण हद्दीतील हजारो बाधित कुटुंबे अनधिकृत घरांमध्ये राहत आहेत. परंतु छुप्या आणि जाचक अटींमुळे हजारो नागरिकांनी घरे नियमिती करणासाठीच्या सूचना समितीकडे देण्यास सुरुवात केलेली आहे. समितीकडे आजपर्यंत पाच हजार सूचना फॉर्म जमा झाले आहेत. त्यातील प्रमुख सूचना ‘घर बचाव संघर्ष समिती’ मुख्य प्रधान सचिव, नगरविकास मंत्रालय, मुंबई, महाराष्ट्र राज्य येथे पाठविणार आहे. नागरिकही सदरच्या सूचना प्रशासनास पाठवीत आहेत.
घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने साईराम कॉलनी, पंचरत्न कॉलनी, बळवंत कॉलनी, शिवप्रसाद कॉलनी, औदुंबर कॉलनी, सोपानबाग कॉलनी या परिसरात कोपरा सभा घेण्यात आल्या. आापर्यंत बिजलीनगर, गुरुद्वारा, रावेत, चिंचवडेनगर परिसरात नऊकोपरा सभा घेण्यात आल्या.
समिती समन्वयक विजय पाटील, रेखा भोळे, राजेंद्र देवकर, शिवाजी इबितदार, सचिन काळभोर सभेस मार्गदर्शन करीत आहेत.