जमिनीच्या कारणावरून एकाचे अपहरण केल्याप्रकरणी ६ जणांवर कामशेत पोलिसांत गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 05:28 PM2018-01-16T17:28:18+5:302018-01-16T17:42:36+5:30
जमीन आपल्या नावावर करण्याप्रकरणी एकाचे अपहरण करून त्याला दमदाटी, शिवीगाळ व मारहाण केल्याने त्याने भीतीपोटी विषारी औषध घेतल्याने सहा जणांवर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कामशेत : येथील नायगावमध्ये एकाची जमीन आपल्या नावावर करण्याप्रकरणी एकाचे अपहरण करून त्याला दमदाटी, शिवीगाळ व मारहाण केल्याने त्याने भीतीपोटी विषारी औषध घेतल्याने सहा जणांवर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी शंकर विठोबा वावरे (वय ५०, रा. नायगाव मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर विठोबा वावरे (वय ५०, रा. नायगाव मावळ) यांची नायगाव मावळ येथील गट नं. २८० मध्ये ३८.२५ आर इतके क्षेत्र असून ते त्यांचा मुलगा सोमनाथ शंकर वावरे याच्या नावे आहे. सोमनाथ यास रवी वाकडकर (रा. वाकड, पुणे) आणि सचिन जगदाळे (तळेगाव दाभाडे) यांनी दारू पाजून व आमिष दाखवून दमदाटीच्या जोरावर नवनाथ ज्ञानू गायखे (रा. खामशेत मावळ) यास कुलमुखत्यार पत्र करून देण्यास भाग पाडले. तसेच चेतन साहेबराव सोरटे (रा. तळेगाव दाभाडे) यांच्या साक्षीने खरेदीखत करून देण्यास भाग पाडले. यावर सोमनाथ वावरे व कांताबाई विठ्ठल पारखी यांना सदरचे खरेदीखत मान्य नसल्याने त्यांनी खरेदीखतास हरकत नोंद होण्याकरिता नायगाव तलाठी यांच्याकडे अर्ज केला. यावरून सोमनाथ वावरेला हरकत मागे घेण्यासाठी शिवीगाळ, दमदाटी करीत सोमवारी दि. ८ रोजी सायंकाळी चार वाजनेचे सुमारास सोमनाथ वावरे यास चारचाकी वाहनात जबरदस्तीने बसवून त्याचे अपहरण केले. त्याला मारहाण, दमदाटी व शिवीगाळ करून रात्री सात वाजण्याच्या सुमारास नायगाव येथे सोडून दिले. त्यानंतर त्याला उलट्या झाल्या व तो बेशुद्ध झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सोमनाथने नायगाव येथील जमीन गट नं. २८० मध्ये दाखल केलेली हरकत मागे घ्यावी या कारणावरून त्याला दमदाटी, मारहाण, शिवीगाळ व जबरदस्तीने पळवून नेल्याने या भीतीपोटी सोमनाथने विषारी औषध घेतल्याच्या प्रकाराने त्याचे वडील शंकर वावरे यांनी कामशेत पोलीस ठाण्यात सात जणांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी निलेश दत्तात्रय तापकीर, स्वाती निलेश तापकीर (रा. चोवीस वाडी, ता. हवेली), गणेश रमेश पिंपळे (रा. खामशेत मावळ), चेतन साहेबराव सोरटे (रा. तळेगाव) रवी वाकडकर (रा. वाकड पुणे), सचिन जगदाळे (रा. तळेगाव) आणि नवनाथ ज्ञानू गायखे (रा. खामशेत मावळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक महेंद्र वाळुंजकर करीत आहेत.