ग्रामसेवकास रंगेहात पकडले; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मावळात कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 06:54 PM2017-12-06T18:54:56+5:302017-12-06T18:56:59+5:30
मावळ तालुक्यातील आढे गावच्या ग्रामसेवकाला दोन हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.
तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील आढे गावच्या ग्रामसेवकाला दोन हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.
शासकीय अनुदानातून शौचालय मंजूर केल्याप्रकरणी तक्रारदारास दोन हजार रूपयांची मागणी केली होती. परमेश्वर विनायक गोमसाळे (वय ३२, रा. लक्ष्मीनगर, वडगाव मावळ) असे लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका २४ वर्षीय तक्रारदार पुरूषाने, त्यांच्या घराजवळ स्वच्छतागृह बांधले होते. त्यासाठी शासनाकडून अनुदान मिळाले होते. तक्रारदार यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा करण्यासाठी गोमसाळे याने तक्रारदाराकडे दोन हजार रूपयांची मागणी केली. ती लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आढे गावच्या चौकात गोमसाळे यास बुधवारी दुपारी अटक केली.
पोलीस निरीक्षक अर्चना बोदडे, पोलीस निरीक्षक जालिंदर तांदळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. शासकीय अधिकाऱ्यांनी लाच मागितल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन संबंधित अधिकाऱ्यांनी केले आहे.
लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले
दरम्यान, मावळ तालुक्यातील जमिनींना सोन्याचे भाव आले आहेत. तसेच सेंकड होमसाठी अनेकांनी तालुक्याला पसंती दिली आहे. त्यामुळे जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहेत. या व्यवहाराची नोंद करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाच दिली जात आहे. आत्तापर्यंत अनेक जण लाचलुचपत विभागाच्या कारवाईमध्ये सापडले आहेत. या कारवाईने लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.