गुणवत्ता सुधारल्याने पटसंख्येत वाढ, जानकीदेवी बजाज ग्राम शिक्षण संस्थेचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 04:22 AM2017-08-27T04:22:12+5:302017-08-27T04:22:39+5:30
शिक्षकांना प्रशिक्षण, विद्यार्थ्यांना हसत-खेळत शिक्षण, पालकांचा सहभाग घेऊन गुणवत्ता सुधारणेसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यासाठी महापालिकेला उद्योगनगरीतील खासगी कंपन्यांच्या ‘कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ (सीएसआर) निधी व उपक्रमांची मदत झाली.
- हणमंत पाटील ।
पिंपरी : शिक्षकांना प्रशिक्षण, विद्यार्थ्यांना हसत-खेळत शिक्षण, पालकांचा सहभाग घेऊन गुणवत्ता सुधारणेसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यासाठी महापालिकेला उद्योगनगरीतील खासगी कंपन्यांच्या ‘कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ (सीएसआर) निधी व उपक्रमांची मदत झाली. त्यामुळे शहरातील झोपडपट्टी भागात असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ होऊन गैरहजेरीचे प्रमाण घटत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका व जानकीदेवी बजाज ग्राम शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील ९९ शाळांची निवड शैक्षणिक दर्जा सुधारणासाठी करण्यात आली आहे. त्यासाठी सर्व शिक्षा अभियान व शिक्षणाचा अधिकार कायद्याच्या उद्दिष्टांचा आधार घेण्यात आला. त्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यावर भर देण्यात आला. त्यामध्ये बाके, संगणक, प्रयोगशाळा साहित्य, ई-लर्निंग संच, वाचनालयासाठी पुस्तके, शुद्ध पाण्याची सुविधा, बालवाडी व क्रीडा साहित्य, ध्वनी यंत्रणा व वाद्य आदी सुविधा देण्यात आल्या. त्यामुळे शिक्षकांचा शिकविण्यासाठी उत्साह वाढला असून, विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची गोडी निर्माण झाली आहे.
शिक्षक, विद्यार्थी व पालक अशा तीनही महत्त्वाच्या घटकांसाठी वर्षभर गुणवत्तावाढीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात. त्यामध्ये इंग्रजी, गणित व भाषा विषय सोपे करून विद्यार्थ्यांना समजून सांगणे, हसत-खेळत गणित सोडविणे, भाषा विषयातील गमती, इतिहासातील गोष्टी, सणांचे महत्त्व व सहलीद्वारे भौगोलिक परिस्थिती समजून सांगितली जाते. या कार्यक्रमांत विद्यार्थ्यांबरोबर शक्य तिथे पालकांनाही सहभागी करून घेण्यात आले. पालकांसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आले. मुलींसाठी आत्मरक्षा प्रशिक्षण, विज्ञान प्रदर्शन, वृक्षारोपण आदी उपक्रम राबविले. त्यामुळे शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांतील संवाद वाढला. त्याचा गुणवत्ता वाढीसाठी उपयोग झाला. गैरहजेरीचे प्रमाणात घट झाली. पालिकेच्या माता रमाबाई आंबेडकर, ज्ञानप्रभा विद्यामंदिर व यशवंतराव चव्हाण शाळांमध्ये उपक्रमांचा परिणाम गुणवत्ता व पटसंख्या वाढीत दिसत आहे, असे संस्थेचे पी. एस. मुखर्जी यांनी सांगितले.
मराठी शाळांकडे वाढला कल...
चिंचवड येथील अजंठानगर, शरदनगर, भीमशक्तीनगर व मोरे वस्ती या झोपडपट्टी भागातील विद्यार्थी माता रमाबाई आंबेडकर प्राथमिक शाळेत आहेत. या शाळेत विद्यार्थ्यांना पाठविण्यासाठी पूर्वी पालकांना घरी जाऊन विनंवनी करावी लागत होती. आता या शाळेतील गुणवत्तावाढीसाठी प्रभारी मुख्याध्यापिका रजनी सय्यद, बजाज संस्थेचे अधिकारी पी. एस. मुखर्जी, डॉ. चित्रा सोहोनी, के. बी. वाळके, डॉ. श्रुती चौधरी व स्थानिक आजी-माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले. शिवाय अमृता ट्रस्टतर्फे विद्यार्थ्यांना दर शनिवारी व रविवारी गणित, इंग्रजी व विज्ञान विषयांवर विशेष मार्गदर्शन करण्यात येते.
शाळेत १०० टक्के उपस्थित राहणाºया विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली असून, गुणवत्ता वाढल्याने महापालिकेच्या शाळेकडे बघण्याचा पालकांचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यामुळे इंग्रजी शाळेतून काही विद्यार्थी मराठी शाळेकडे वळले आहेत, असे उपक्रमशील शिक्षक सतीश पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.