महागाईच्या झळा श्वान संतती नियमनाला, पशूवैद्यकीय विभाग : एका प्राण्यासाठी ६४९ रुपयांचा खर्च ६९३ रुपयांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 03:50 AM2017-08-21T03:50:35+5:302017-08-21T03:50:35+5:30
भटकी, मोकाट कुत्री पकडून त्यांच्यावर संतती नियमनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने तीन संस्थांना ठेका दिला आहे. महागाईचा फटका कुत्र्याच्या संतती नियमनाला बसला आहे. एका कुत्र्याच्या शस्त्रक्रियेसाठी पूर्वी ६४९ रुपये खर्च येत असे. आता तो ६९३ रुपयांवर पोहोचला आहे.
पिंपरी : भटकी, मोकाट कुत्री पकडून त्यांच्यावर संतती नियमनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने तीन संस्थांना ठेका दिला आहे. महागाईचा फटका कुत्र्याच्या संतती नियमनाला बसला आहे. एका कुत्र्याच्या शस्त्रक्रियेसाठी पूर्वी ६४९ रुपये खर्च येत असे. आता तो ६९३ रुपयांवर पोहोचला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागातर्फे भटक्या, मोकाट कुत्र्यांच्या संततीला रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात. महापालिकेबरोबरच अनेक अशासकीय संस्थांच्या माध्यमातून कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी योजना, उपक्रम राबविले आहेत. मार्च २०१४ ते एप्रिल २०१७ या कालावधीत पीपल फॉर अॅनिमल, पुणे आणि सोसायटी फॉर अॅनिमल प्रोटेक्शन, कोल्हापूर या दोन संस्थांच्या माध्यमातून हे काम करण्यात आले. त्यामध्ये भटकी, मोकाट कुत्री पकडणे, त्यांच्यावर संतती नियमनाची शस्त्रक्रिया करणे, रेबीज प्रतिबंधक लसीकरण करणे, अशा कुत्र्यांना सांभाळणे, खावटी पाणी देणे, स्वच्छता ठेवणे आणि शस्त्रकियेनंतर त्यांना पुन्हा मूळ जागी नेऊन सोडणे आदी कामांचा समावेश आहे. त्यासाठी आवश्यक साहित्य, औषधे, मनुष्यबळ, वाहनव्यवस्था, इंधन आदीसाठी येणारा खर्च ठेकेदार संस्थांद्वारे करण्यात येतो.
या दोन्ही संस्थांचा कालावधी एक-एक वर्षाचा होता. त्यांना दोन वर्षांची मुदतवाढ दिल्यानंतर ही मुदतही नुकतीच संपली आहे. तरीही त्यातील पीपल फॉर अॅनिमल या संस्थेला पुढील निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन संस्थांची निवड होईपर्यत अर्थात दोन महिन्यांच्या कालावधीसाठी मुदतवाढ दिली आहे. मात्र, महापालिकांच्या प्रभाग कार्यालयांची वाढती संख्या लक्षात घेता आता तीन नवीन अशासकीय संस्थांना या कामाचा ठेका देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठीची निविदा प्रसिद्ध केली आहे. या तीन संस्थांद्वारे एका वर्र्षभरात २१ हजार कुत्र्यांवर संतती नियमनाच्या शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट ठेवले.
तीन वर्षांत ३९ हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण
मार्च २०१४ ते एप्रिल २०१७ या कालावधीत पीपल फॉर अॅनिमल, पुणे आणि सोसायटी फॉर अॅनिमल प्रोटेक्शन, कोल्हापूर या दोन संस्थांच्या माध्यमातून ३८ हजार ९८७ कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये २०१४-१५ मध्ये १० हजार १६३, २०१५-१६ मध्ये १४ हजार ५६९, तर सन २०१६-१७ मध्ये १४ हजार २५५ कुत्र्यांवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यासाठी अनुक्रमे ६९ लाख ७५७ रुपये, १ कोटी ९ लाख ५५ हजार ५२३ आणि ८७ लाख १९ हजार ३१५ रुपये असा २ कोटी ६५ लाख ७५ हजार ५९५ रुपये खर्च आला आहे.