लाडक्या श्रीगणरायाचे स्वागत करण्यासाठी अवघी उद्योगनगरी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 06:00 AM2017-08-25T06:00:13+5:302017-08-25T06:00:15+5:30
लाडक्या श्रीगणरायाचे स्वागत करण्यासाठी अवघी उद्योगनगरी सज्ज झाली आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येलाच घराघरात बाप्पा आणण्याची प्रथा असल्याने बाप्पाचे मंगलमय आगमन झाले असून, शुक्रवारी विधिवत प्राणप्रतिष्ठा करून दहा दिवस उत्सवाच्या पवित्र सुगंधाची उधळण सांस्कृतिक शहरात होणार आहे
पिंपरी : लाडक्या श्रीगणरायाचे स्वागत करण्यासाठी अवघी उद्योगनगरी सज्ज झाली आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येलाच घराघरात बाप्पा आणण्याची प्रथा असल्याने बाप्पाचे मंगलमय आगमन झाले असून, शुक्रवारी विधिवत प्राणप्रतिष्ठा करून दहा दिवस उत्सवाच्या पवित्र सुगंधाची उधळण सांस्कृतिक शहरात होणार आहे.
तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता अशी प्रचिती असलेल्या श्रीगणेशाच्या घराघरातील आगमनाने भक्तांच्या मनावरील निराशेचे मळभ दूर होऊन एक नवा उत्साह निर्माण झाला आहे. त्याच्या स्वागतासाठी घरांमध्ये सजावटीचा अनोखा साज चढविण्यात आला आहे. पुढील दहा दिवस ढोलताशांचे निनाद, गौरीचे आगमन, गोडाधोडाचे नैवैद्य, याची रेलचेल पाहायला मिळणार आहे. गुरूवारचा पूर्वदिवस महिलांसह गणेश मंडळाच्या कार्यकतर््यांसाठी अधिकच गडबडीचा होता. पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी या परिसरातील चौकाचौकांत गणेशमूर्तींचे स्टॉल लागले असल्याने भाविक श्रींच्या मूर्तीचे बुकिंग करताना दिसत होते. अनेक आबालवृद्ध खास ठेवणीतला पेहराव करून श्रींची मूर्ती घेऊन जात होते. या वर्षी पर्यावरणाचा विचार करून अनेक भाविकांनी आवर्जून प्लॅस्टर आॅफ पॅरिसऐवजी शाडूची मूर्ती पसंत दिली. चारचाकी, दुचाकी वाहनांमधून श्रींच्या मूर्ती नेण्याचे प्रमाण मोठे होते. कमळ-केवडा, जास्वंद, दुर्वा-हार-फुले आणि फळे या पूजा साहित्याच्या खरेदीसाठी पिंपरीतील मंडईचा परिसर गजबजून गेला होता. सायंकाळी पाय ठेवायला देखील जागा नव्हती.