महामार्गावरून दारू थेट गावात
By admin | Published: May 10, 2017 04:09 AM2017-05-10T04:09:54+5:302017-05-10T04:09:54+5:30
सर्वोच्च न्यायालयाने पाचशे मीटरच्या आतील दारू दुकानांवर बंदी घालण्याचा आदेश दिल्यामुळे आळंदी दिघी पालखी मार्ग महामार्ग
लोकमत न्यूज नेटवर्क
दिघी : सर्वोच्च न्यायालयाने पाचशे मीटरच्या आतील दारू दुकानांवर बंदी घालण्याचा आदेश दिल्यामुळे आळंदी दिघी पालखी मार्ग महामार्ग म्हणून घोषित करण्यात आल्याने या रस्त्यावरील दारू माफियांचे धाबे दणाणले होते. मात्र यामधूनही त्यांनी शक्कल लढवून दिघीतील चायनीज सेंटरवाल्यांना हाताशी धरत महामार्गावरील दारूने आता थेट गावातच शिरकाव केल्याने चायनीज सेंटरची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढतच असून, अवैध धंद्यांना ऊत आल्याचे चित्र परिसरात दिसत
आहे.
पूर्वी दिघी परिसरातील चायनीज सेंटरची संख्या बोटावर मोजण्याएवढीच होती. मात्र या एका महिन्यात चायनीजचे प्रस्थ वाढत असून, यासाठी परिसरातील मुख्य चौकातील, वर्दळीच्या ठिकाणांची निवड करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीमहाराज चौक, दिघी-आळंदी रस्त्यावरील दत्तनगर, परांडेनगर परिसरात चायनीजची दुकाने उभी राहत आहेत. चायनीजच्या खाद्यपदार्थांसोबतच अवैध दारूची बिनधास्त सुरू असलेली विक्री उघडपणे सुरू आहे.
रात्री ११पर्यंत सुरू असलेली ही चायनीजची दुकाने आता नुसती खाद्यपदार्थांची न राहता दारूचे अड्डे बनले आहेत. हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस चौकीला मात्र याची पुसटशी कल्पना नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. रस्त्यावर थाटलेल्या दुकानात आलेल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी येथे पार्सल सेवा, बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्य उत्पादनशुल्क विभागाच्या नियमांना बगल देत अवैधरीत्या देशी, विदेशी दारू विक्री होत असल्याने रस्त्यावर गर्दुल्यांचा मोठ्या प्रमाणावर राबता असतो. महिलावर्गाला तर या रस्त्याने मार्ग काढणे जिकिरीचे होऊन बसले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दारू अड्डे बंद होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, काही महाभागांनी पळवाटा शोधत आपला अनधिकृत व्यवसाय सुरूच ठेवला आहे. यावर प्रशासन कशी कारवाई करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.