पहिल्या टप्प्यात पिंपरीपर्यंतच धावणार महामेट्रो; पालकमंत्री गिरीष बापट यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 06:09 PM2018-01-18T18:09:56+5:302018-01-18T18:12:59+5:30
पुणे महामेट्रो पहिल्या टप्प्यात पिंपरीपर्यंतच धावणार आहे. दुसऱ्या टप्प्यात अतिशय वेगात काम करून निगडीपर्यंत मेट्रो नेण्यात येईल, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.
पिंपरी : पुणे महामेट्रो पहिल्या टप्प्यात पिंपरीपर्यंतच धावणार आहे. या मार्गाला अगोदर सगळ्या मंजुऱ्या घेतल्या आहेत. त्यामुळे पिंपरीपर्यंत मेट्रो अगोदर सुरु होऊ द्या. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात अतिशय वेगात काम करून निगडीपर्यंत मेट्रो नेण्यात येईल, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.
पुणे महामेट्रोच्या वल्लभनगर येथील मेट्रो स्टेशनच्या कामाचे भूमिपूजन गुरुवारी बापट यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर नितीन काळजे, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, उपमहापौर शैलजा मोरे, सभागृह नेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.
गिरीश बापट म्हणाले, की निगडीपर्यंत मेट्रोची आवश्यकता आहे. त्याचा डीपीआर बनिवण्याचे काम सुरु आहे. पिंपरीपर्यंत मेट्रो सुरु होईपर्यंत निगडीच्या मेट्रोचा डीपीआर तयार होईल. डीपीआर बनवायला वेळ लागणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा पिंपरीपर्यंत मेट्रो सुरु होऊ द्या. नंतर दुसऱ्या टप्प्यात पहिले काम निगडीचे घेण्यात येईल. ते खूप सोपे असून आवश्यक देखील आहे.
पालिकेतील पदाधिकाऱ्यांना, आयुक्तांना निगडीपर्यंतच्या मेट्रोचा डीपीआर तयार करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पिंपरीपर्यंत मेट्रो सुरु होईपर्यंत एकीकडे निगडीपर्यंतचा 'डीपीआर' तयार होईल. त्याला केंद्र, राज्य सरकाराची मान्यता घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले. पिंपरी ते रामवाडीचा प्लॅन अगोदर ठरला होता. त्याला महामेट्रो, केंद्र आणि राज्य सरकारची मान्यता मिळाली आहे. पहिले काम प्राथमिक अवस्थेत आहेत. ते पूर्ण होईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कात्रज, सिंहगड, निगडीपर्यंत मेट्रो करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.