पाणी प्रश्नावरून महापौर भडकले, पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास कारवाई करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 01:14 AM2017-09-20T01:14:06+5:302017-09-20T01:14:16+5:30
च-होली-मोशी हा पिंपरी-चिंचवडच्या महापौर नितीन काळजे यांचा प्रभाग. गेल्या महिनाभरापासून या प्रभागात दूषित आणि अनियमितपणे पाणीपुरठा सुरू आहे, याबाबत महापौरांनी अधिका-यांकडे तक्रार करूनही प्रश्न सुटलेला नाही. म्हणून आज महापौर पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांवर भडकले.
पिंपरी : च-होली-मोशी हा पिंपरी-चिंचवडच्या महापौर नितीन काळजे यांचा प्रभाग. गेल्या महिनाभरापासून या प्रभागात दूषित आणि अनियमितपणे पाणीपुरठा सुरू आहे, याबाबत महापौरांनी अधिका-यांकडे तक्रार करूनही प्रश्न सुटलेला नाही. म्हणून आज महापौर पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांवर भडकले. दोन दिवसांत पाणीप्रश्न सुटला नाही, तर तुमच्यावर कारवाई करावी लागेल, असा इशाराही दिला.
पिंपरी-चिंचवड शहराला मावळ परिसरातील पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे दिवसाआड सुरू असणारा पाणीपुरवठा नियमित करण्यात आला. समाधानकारक पाणीसाठा असूनही शहरातील विविध भागांत पिण्याचे पाणी कमी दाबाने येणे, अपुरा पाणीपुरवठा होणे, दूषित पाणी येणे अशा तक्रारी येत आहेत. मात्र, महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे. याबाबत महापौर नितीन काळजे यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र, तक्रारींचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे महापौरांच्या निदर्शनास आले आहे.
महापौर काळजे म्हणाले, ‘‘च-होली गावठाण परिसर, आझादनगर, काळी भिंत परिसर, दाभाडेवस्ती, पद्मावतीनगरी येथपासून बुरडेवस्तीपर्यंतच्या भागात दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून पाणी दूषितच येत आहे. अधिकारी येतात, पाहणी करून जातात.
दोन दिवसांत हा प्रश्न सुटायला हवा. बुधवारी सकाळी अधिका-यांनी या भागाची पाहणी करून दूषित पाणी कोठून येते, याचा शोध घ्यावा. त्यावर उपाययोजना कराव्यात. प्रश्न न सुटल्यास संबंधित अधिका-यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. शहरातील विविध भागांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. त्याबाबत तक्रारी आहेत. नागरिकांच्या तक्रारी सोडविणे गरजेचे आहे. त्याबाबत कोणाचीही गय केली जाणार नाही.’’
>महापौर दालनात बैठक : गढूळ पाणीपुरवठा
पाणीपुरवठा विभागाकडून दूषित पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडविला जात नसल्याचा अनुभव महापौरांना आला. महिनाभरापासून च-होली-मोशी प्रभागात दूषित आणि अपुरा पाणीपुरवठा होत आहे. याबाबत स्वत: लक्ष घालून महापौरांनी प्रशासनास सूचनाही केल्या. मात्र, प्रश्न न सुटल्याने महापौरांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांना मंगळवारी सायंकाळी कार्यालयात बोलावून घेतले. प्रश्न सुटत नसल्याने ते अधिका-यांवर भडकले. महापौरांच्या प्रभागातील पाण्याचा प्रश्न सुटत नसेल, तर इतर प्रभागांचे काय? हे खपवून घेतले जाणार नाही, असे सुनावले.