मैलामिश्रित सांडपाणी थेट नदीपात्रात; नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 02:05 AM2017-11-10T02:05:22+5:302017-11-10T02:05:22+5:30
मैलामिश्रित सांडपाणी थेट नदीपात्रात जात असल्याने सांगवी परिसरातून वाहणाºया मुळा आणि पवना या नद्या प्रदूषित झाल्या आहेत.
पिंपळे गुरव : मैलामिश्रित सांडपाणी थेट नदीपात्रात जात असल्याने सांगवी परिसरातून वाहणाºया मुळा आणि पवना या नद्या प्रदूषित झाल्या आहेत. पिंपळे गुरवमधील स्मशानभूमीच्या पाठीमागे ड्रेनेज फुटल्याने पिंपळे गुरवमधील जवळकरनगर, वैदुवस्ती परिसरातील सांडपाणी थेट नदीपात्रात जात आहे.
तसेच जुनी सांगवीतील शितोळे पेट्रोल पंपाच्या विरुद्ध बाजूला पुणे महापालिकेच्या हद्दीत संपूर्ण औंध गावाचे सांडपाणी थेट नदीपात्रात जात आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून ड्रेनेजचे पाणी नदीपात्रात येत असूनही पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिका प्रशासन याकडे काणाडोळा करीत आहे. चेंबर दुरुस्त करून नदीपात्रात येणारे पाणी थांबवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मुळा नदीपात्राचीही वेगळी परिस्थिती नाही. पिंपळे निलखपर्यंत स्वच्छ असणारे नदीपात्र सांगवीनजीक प्रदूषणामुळे बरबटून गेले आहे. संपूर्ण औंधचे पाणी वाहून नेणारी ड्रेनेज लाईन सांगवीजवळ फुटल्याने गेल्या कित्येक महिन्यांपासून संपूर्ण मैलापाणी नदीपात्रात जात आहे. याकडे पुणे महापालिका प्रशासन मात्र डोळेझाक करीत आहे. यामुळे जुनी सांगवी परिसरात प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
आले आहे. मुळा नदीपात्रात येणारे हे मैलापाणी रोखण्याची मागणी जुनी सांगवीतील मधुबन सोसायटीतील नागरिकांनी केली आहे.
माजी नगरसेवक राजेंद्र जगताप म्हणाले की, एवढ्या मोठ्या प्रमाणात मैलायुक्त पाणी नदीपात्रात जात असताना याकडे दुर्लक्ष आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वीच या ड्रेनेज लाइनचे काम केले आहे. तरीही निकृष्ट कामामुळे ही लाइन फुटली आहे. याचा फटका पिंपळे गुरव, सांगवीकरांना बसत आहे. त्यामुळे नदीपात्रात येणारे मैलापाणी लवकरात लवकर रोखण्यात यावे.
याबाबत नगरसेवक सागर आंगोळकर म्हणाले की, मैलामिश्रित सांडपाणी नदीपात्रात मिसळत असल्याच्या
ठिकाणी काम करणार आहे. याबाबत ताबडतोब आरोग्य विभागाशी संपर्क करून काम पूर्ण करणार आहे. नदीपात्रात कोणत्याही प्रकारची घाण, कचरा नागरिकांनी टाकू नये.