स्वच्छतेला महत्त्व देण्याची गरज - गिरीश बापट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 02:49 AM2017-11-29T02:49:58+5:302017-11-29T02:50:32+5:30
पुणे जिल्ह्यात सुमारे २५ हजार अन्न पदार्थ विक्रेते आहेत. मात्र केवळ ३ हजार व्यावसायिकांनी अन्न परवाना घेतला आहे. परवाना घेतलाच पाहिजे, शिवाय पदार्थांचा दर्जा राखला पाहिजे. स्वच्छता महत्त्वाची आहे.
चिंचवड : पुणे जिल्ह्यात सुमारे २५ हजार अन्न पदार्थ विक्रेते आहेत. मात्र केवळ ३ हजार व्यावसायिकांनी अन्न परवाना घेतला आहे. परवाना घेतलाच पाहिजे, शिवाय पदार्थांचा दर्जा राखला पाहिजे. स्वच्छता महत्त्वाची आहे. नागरिकांच्या आरोग्याशी निगडित हा व्यवसाय असल्याने स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे, असे मत अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. बापट यांनी अन्नपदार्थ विक्रेत्यांना रीतसर परवानगी घेऊन व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. कार्यशाळेस अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त डॉ़ पल्लवी दराडे, आयुक्त श्रावण हर्डीकर, एमसीसीआयएच्या अन्न प्रक्रिया विभागाचे अध्यक्ष आनंद चोरडिया आदी उपस्थित होते.
अन्न आयुक्त डॉ़ पल्लवी दराडे यांनी हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने व्यावसायिकांनी कोणकोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अन्नसुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगून रस्त्यावर अन्नपदार्थ विक्री करणाºयांनी दर्जासह स्वच्छतेस प्राधान्य द्यावे, असे नमूद केले. अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संपत देशमुख कार्यशाळेदरम्यान गिरीश बापट यांच्याबरोबर उपस्थित अधिकारी, कर्मचारी, व्यावसायिकांनी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.
प्रास्ताविक सहायक आयुक्त शिवाजी देसाई यांनी केले. अन्नसुरक्षा अधिकारी संतोष सावंत यांनी सूत्रसंचालन केले. पिंपरी-चिंचवड हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष पद्मनाभ शेट्टी, सहायक आयुक्त संजय नारागुडे, अ. गो. भुजबळ, सं. पां. शिंदे, श्रीमती भोईटे उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी एस़ पी़ धुळे, दिलीप करंजखेले, के़ बी़ जाधव, भांडवलकर, आऱ जे़ जेकटे, आऱ जी़ नागवेकर, एल़ एस़ सावळे यांनी पुढाकार घेतला होता.
स्वच्छता हीच परमेश्वरी तत्त्व असल्याने त्याचा सर्व अन्न व्यावसायिकांनी अवलंब करावा. तसेच अन्न सुरक्षेबाबतचे महत्त्व विशद करून अशा प्रकारच्या कार्यशाळा अधिकाधिक आयोजित कराव्यात.
- गिरीश बापट, पालकमंत्री