पिंपरी-चिंचवड आरटीओ दलालमुक्त करणार, पूर्णानगर येथील कार्यालयातील कामकाजात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 01:58 AM2017-10-24T01:58:09+5:302017-10-24T01:58:22+5:30
पिंपरी : पूर्णानगर येथील आरटीओमध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून रूजू झाल्यानंतर कामकाजात पारदर्शकता आणण्याचा कसोशीचा प्रयत्न सुरू केला आहे. हळूहळू बदल दिसून येत आहेत.
पिंपरी : पूर्णानगर येथील आरटीओमध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून रूजू झाल्यानंतर कामकाजात पारदर्शकता आणण्याचा कसोशीचा प्रयत्न सुरू केला आहे. हळूहळू बदल दिसून येत आहेत. दलालांचा सुळसुळाट झाल्याबद्दलचा मुद्दा उपस्थित झाला. परंतु नागरिकांनी काम करण्यासाठी दलालाला मध्यस्थी करून घेऊ नये. त्याच्याकडे न जाता, थेट कार्यालयातील कर्मचारी, अधिका-यांकडे जाऊन काम करवून घ्यावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी केले.
आरटीओ कार्यालयातील कारभार दलालमुक्त करण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यासाठी सर्वत्र फलक लावण्याची विशेष मोहीम सुरू केली आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली. ते म्हणाले, की वाहनाची नोंदणी, वाहन चालविण्याचा शिकाऊ, तसेच पक्का परवाना, नूतनीकरण, तसेच विविध कारणांस्तव भरावा लागणारा
कर, दंड अशा विविध कामांनिमित्ताने आरटीओत रोजची वर्दळ असते. या वर्दळीत काम करून देतो, असे सांगून शासकीय शुल्कापेक्षा नागरिकांकडून अधिक शुल्क घेऊन काही दलाल अवाजवी रक्कम उकळतात. याबद्दल तक्रार आल्यास कारवाई केली
जाते. अधिकृत असे दलाल नाहीतच, मात्र नागरिकांनी दलालांकडे जाऊच नये, याची दक्षता घेण्याचा प्रयत्न केला आहे.
आरटीओच्या इमारतीत प्रवेश करताच समोर लगेच दिसून येईल, असे फलक लावले आहेत. त्यावर कोणत्या विभागात कोणते काम होईल, याची माहिती दिली आहे. एवढेच नव्हे, तर कोणता
विभाग कोठे आहे, याचा नकाशा दिला आहे. आरटीओत काही काम असेल, तर ते कसे करवून घ्यावे. शुल्क किती भरावे, ही माहिती दिल्याने जनजागृती होत आहे. परिणामी दलालांकडे न जाता, स्वत:ची कामे स्वत: करण्यास पुढे येणाºयांची संख्या वाढत आहे, ही जमेची बाजू आहे.
>कार्यालयाच्या आवारातील अस्वच्छता, दुर्गंधीबद्दलही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. आरटीओची इमारत भाड्याची आहे. त्यामुळे तेथे काही करायचे झाल्यास मर्यादा येतात. तरीही स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून नुकतीच साफसफाई केली आहे. निदान आता तरी अस्वच्छता, दुर्गंधीचा त्रास कमी झाला आहे. मोशी येथे नवीन इमारतीत स्थलांतर झाल्यास ही समस्याही दूर होणार आहे. नागरिकांना कोणत्या विभागात काही अडचणी आल्या, तर त्यांनी थेट माझ्याकडे यावे, त्यांची अडचण दूर होईल. उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांच्या दालनात सामान्य नागरिक असो अथवा अन्य कोणी त्यांना थेट प्रवेश आहे. पारदर्शक कारभार व्हावा, हाच त्यामागे उद्देश आहे.
- आनंद पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी