‘त्या’ झाडांच्या पुनर्रोपणासाठी प्राधिकरणाची जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 02:48 AM2017-08-03T02:48:48+5:302017-08-03T02:48:48+5:30
मेट्रो प्रकल्पासाठी पिंपरी महापालिका ते हॅरिस ब्रीजमध्ये अंदाजे १० वर्षांपुढील सुमारे २१२ वृक्ष काढावे लागणार आहेत. मात्र, या सर्व झाडांचे पुनर्रोपण प्राधिकरणातील पेठ क्रमांक २९ येथील पाच एकर जागेत करण्यात येणार आहे.
पिंपरी : मेट्रो प्रकल्पासाठी पिंपरी महापालिका ते हॅरिस ब्रीजमध्ये अंदाजे १० वर्षांपुढील सुमारे २१२ वृक्ष काढावे लागणार आहेत. मात्र, या सर्व झाडांचे पुनर्रोपण प्राधिकरणातील पेठ क्रमांक २९ येथील पाच एकर जागेत करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने जागा दिल्यास त्याठिकाणीही वृक्षलागवड करण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या पर्यावरणाला कोणताही धोका निर्माण होणार नाही, असे स्पष्टीकरण महामेट्रो प्रकल्पाचे उपमहाव्यवस्थापक (उद्यान विभाग) भानुदास माने यांनी दिले.
ग्रीन सिटीचा लौकिक असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीतील ‘४८६ झाडांचा बळी मेट्रो प्रकल्पाच्या कामांमुळे’ जाणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. त्यानंतर शहरातील प्राधिकरण कृती समिती व सिटीजन फोरम या पर्यावरण प्रेमी संघटनांनी संबंधित वृक्षांचे पुनर्रोपण करण्याची मागणी केली. तसेच, मेट्रोसाठी पर्यावरण पणाला लावू नका, असा आक्षेप घेतला होता. त्यानंतर महामेट्रोच्या व्यवस्थापनाने दखल घेत संबंधित वृक्षांचे पुनर्रोपण करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.