अल्पवयीन मुलींवरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 06:56 PM2018-09-20T18:56:25+5:302018-09-20T18:58:53+5:30
चॉकलेट देण्याच्या बहाण्याने निर्जन स्थळीनेवून दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार करणा-या दोघांना हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पुणे : चॉकलेट देण्याच्या बहाण्याने निर्जन स्थळीनेवून दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार करणा-या दोघांना हिंजवडीपोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातील एक आरोपी अल्पवयीन असून दुस-याला २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश सत्र न्यायाधीश जी. पी. अगरवाल यांनी दिले आहेत.
अत्याचार झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा बुधवारी रात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. गणेश शालिक निकम (वय २२, रा. संत तुकाराम सहकारी, कासारसाई, मुळशी, मुळ रा. आंचलगाव, जळगाव) असे कोठडी देण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर १६ वर्षीय अल्पवयीन आरोपीची बाल सुधारणागृहात रवानगी करण्यात आली आहे. घटनेतील दोन्ही मुली हा १२ वर्षांच्या आहेत. त्यातील एका पीडितेच्या आईने याबाबत फिर्याद दिली आहे.
रविवारच्या दुपारी तीन ते चार दरम्यान हिंजवडीजवळ असलेल्या संत तुकाराम महाराज मंदिराच्या मागील जंगलात हा प्रकार घडला. पीडित मुली या मंदिराबाहेर खेळण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी मंदिराजवळ राहत असलेल्या आरोपींनी पीडित मुलींना चॉकलेट देण्याच्या बहाण्याने मंदिरामागे असलेल्या जंगलात नेले आणि त्यांच्यावर बलात्कार केला. हा प्रकार कुणाला सांगितला तर पीडित मुलींना जीवे मारण्याचीही धमकीही त्यांनी दिली. त्यामुळे घाबरलेल्या मुलींनी ही घटना घरच्यांना सांगितला नव्हती. मात्र, एका मुलीला त्रास होत असल्याची बाब तिच्या आईच्या लक्षात आली आणि त्याबाबत तिने मुलींना विचारल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला.
आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी, आरोपींना यापूर्वी पीडित मुलींवर अत्याचार केले आहेत का?, आरोपींचे कोणी साथीदार आहेत का? तसेच आरोपींनी या प्रकरणातील मुलींव्यतिरिक्त आणखी कोणत्या मुलींवर अत्याचार केला आहे का? याचा तपास करण्यासाठी आरोपीला पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकील अॅड. मकरंद औरंगाबादकर यांनी केली होती. ती मागणी मान्य करत न्यायालयाने निकम याला २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली तर अल्पवयीन आरोपीची बाल सुधारणागृहात रवानगी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सपना देवतळे करत आहेत.