खड्डा नसल्याचा दावा फोल , महापालिका प्रशासन, लोकमत पाहणीत शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्डेच खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 02:22 AM2017-12-10T02:22:38+5:302017-12-10T02:23:29+5:30
पिंपरी-चिंचवड शहरातील खड्ड्यांच्या परिस्थितीबाबत महापालिका प्रशासनास लेखी विचारणा केली. या वेळी शहरातील विविध रस्त्यावर एकही खड्डा अस्तित्वात नाही. सर्वच्या सर्व ४ हजार ८०८ खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा महापालिकेने केला.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील खड्ड्यांच्या परिस्थितीबाबत महापालिका प्रशासनास लेखी विचारणा केली. या वेळी शहरातील विविध रस्त्यावर एकही खड्डा अस्तित्वात नाही. सर्वच्या सर्व ४ हजार ८०८ खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा महापालिकेने केला. त्यावर ‘लोकमत टीम’ने केलेल्या ‘आॅन द स्पॉट’ पाहणीत शहरातील प्रमुख रस्त्यांवरही खड्डेच खड्डे दिसून आले.
पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवर किती खड्डे आहेत, त्याची दुरुस्ती केली का, अशी महापालिका प्रशासनाकडून माहिती सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी मागविली होती. त्यांना उत्तर देताना महापालिका प्रशासनाने शहरातील रस्त्यांवरील सर्वच्या सर्व खड्डे बुजविण्यात आले असल्याचे उत्तर दिले आहे.
पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील २९ खड्डे पडले होते. ते सर्व बुजविण्यात आले आहेत. औंध-रावेत रस्ता या मार्गावरील सर्व ४०, नाशिक फाटा चौक ते वाकड मार्गावरील सर्व ४८, देहू-आळंदी रस्त्यावरील सर्व ८०, भोसरीतील टेल्को रस्ता येथील सर्व १५ आणि चिंचवड केएसबी चौक ते थेरगावातील डांगे चौक मार्गावरील सर्व ४५ खड्डे तत्परतेने बुजविले आहेत. तर, काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी मार्गावर एकही खड्डा पडला नसल्याचे महापालिका प्रशासनाने उत्तरात नमूद केले आहे.
३१ मार्च ते ३० सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीतील खड्डे बुजविण्याची करवाई करण्यात आली. खड्डे बीएम, बीबी किंवा कोल्ड मिक्स, पेव्हिंग ब्लॉक, जेएसीबी किंवा मुरूम याद्वारे दुरुस्त केले गेले आहेत. शहरातील अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या आठही क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील वेगवेगळ्या रस्त्यांवर एकूण ४ हजार ५५१ खड्डे पडले होते. तसेच, बीआरटीएस मार्गावर एकूण २५७ खड्डे पडले होते. हे सर्व खड्डे क्षेत्रीय कार्यालयाच्या स्थापत्य आणि बीआरटीएस विभागाच्या वतीने तातडीने बुजविण्यात आले असल्याचे महापालिका प्रशासनाने माहितीमध्ये नमूद केले आहे. हे काम पंधरा नोव्हेंबरला पूर्ण करण्यात आले आहे. सद्य:स्थितीत शहरातील रस्त्यावर एकही खड्डा नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शहरातील खड्ड्यांची स्थिती काय अशी माहिती प्रशासनास मागविली होती. त्यावर शहरात खड्डे नाहीत, असे उत्तर दिले आहे. शहराच्या विविध भागांत अद्यापही खड्डे आहेत. त्याची दुरुस्तीदेखील झाली नाही, असे असताना पालिका प्रशासन शहरात एकही खड्डा नाही, असे कसे काय सांगू शकते.
- मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ते
स्थायी समितीचे आदेश वाºयावर
१पिंपरी : यंदाच्या पावसाळ्यात शहरातील विविध भागांत खड्डे पडले होते. यासाठी महापालिका प्रशासनाने खड्ड्यांबाबत तक्रारींसाठी सारथीकडे माहिती कळवा, असे आवाहनही केले होते. तसेच व्हॉट्स अॅप क्रमांक देऊन नागरिकांकडून माहिती मागविली होती. खड्ड्यांबाबतचा विषय स्थायी समिती सभेतही गाजला होता. तातडीने खड्डे बुजवावेत, असे आदेश स्थायी समितीने प्रशासनास दिले होते. त्यानंतर शहरातील १०० टक्के खड्डे बुजविल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
२शहरातील विविध प्रमुख रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांची ‘लोकमत’टीमने शुक्रवारी पाहणी केली. त्यात मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजविल्याचे आढळून आले. मात्र, गावठाणाच्या अंतर्गत भागातील खड्डे तसेच आहेत, हे आढळून आले. समाविष्ट गावांत खड्ड्यांचे प्रमाण अधिक आहे. पावसाळा संपून हिवाळा सुरू झाला, तरी खड्डे काही भरले गेले नाहीत. चिंचवड, दापोडी, काळेवाडी, रहाटणी, थेरगाव, प्राधिकरण, निगडी, पुनावळे, वाकड, ताथवडे, किवळे, चिखली, तळवडे, डुडुळगाव, मोशी, चºहोली आदी परिसरातील रस्त्यांवर खड्डे आढळून आले.
३चिंचवडमधील एसकेएफ कंपनीसमोर, तसेच चिंचवडगावातून फत्तेचंद जैन शाळेकडे जाणाºया रस्त्यावर खड्डे आढळून आले. तसेच प्राधिकरण येथील सेक्टर २६ मध्येही खड्डे आहेत. ताथवडेतील बंगळूर हायवे, सर्व्हिस रस्त्यावर जागोजागी खड्डे दिसून आले. तसेच भोसरी, चिंचवड एमआयडीसी परिसरातील रस्त्यांवर खड्डे आढळून आले.
खोदलेले रस्ते बुजविणार कोण?
खड्ड्यांची पाहणी करीत असताना जलवाहिन्या, सांडपाण्याच्या वाहिन्या, वीजवाहिन्यांसाठी खोदलेले रस्ते व्यवस्थित बुजविले नसल्याचे आढळून आले. शहरातील विविध भागांत वीज मंडळाची कामे सुरू आहेत. तसेच अनेक मोबाइल कंपन्यांची आॅप्टिकल केबलची कामे सुरू आहेत. कामांसाठी रस्ते खोदले जातात; मात्र, ते खड्डे व्यवस्थितपणे बुजविले जात नाहीत. खड्डे व्यवस्थितपणे बुजविले जावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.