बीआरटीसाठी प्रकल्प सल्लागार, महापालिकेचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 06:48 AM2017-08-29T06:48:51+5:302017-08-29T06:48:54+5:30
पिंपरी-चिंचवड परिसरात बीआरटीएसचे प्रकल्प सुरू आहेत. औंध-रावेत आणि दापोडी-निगडी बीआरटीएस रस्त्यावर उड्डाणपूल, सब-वे, ग्रेडसेपरेटर, पादचारी पूल तसेच रस्ता रुंदीकरण अशी विविध कामे करण्यात येत आहेत.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरात बीआरटीएसचे प्रकल्प सुरू आहेत. औंध-रावेत आणि दापोडी-निगडी बीआरटीएस रस्त्यावर उड्डाणपूल, सब-वे, ग्रेडसेपरेटर, पादचारी पूल तसेच रस्ता रुंदीकरण अशी विविध कामे करण्यात येत आहेत. या वेगवेगळ्या कामांसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांची नेमणूक करण्यात येणार आहे.
स्थापत्य बीआरटीएस विभागामार्फत बीआरटीएस रस्ते विकसित करण्याबरोबरच त्यावरील उड्डाणपूल, सब-वे, ग्रेडसेपरेटर, पादचारी पूल तसेच रस्ता रुंदीकरण करण्याची कामे करण्यात येत आहेत. या विभागामार्फत औंध - रावेत, नाशिक फाटा - वाकड या रस्त्यावर बीआरटीएस बससेवा सुरू करण्यात आली आहे. दापोडी ते निगडी रस्त्यावर आॅक्टोबरमध्ये बीआरटीएस बससेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. तसेच काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी या रस्त्यावर डिसेंबरमध्ये बीआरटीएस बससेवा सुरू करण्याचे नियोजन आहे.
देहू ते आळंदी या रस्त्याची महापालिका हद्दीतील रुंदीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत. झेंडेमळा ते महापालिका हद्दीपर्यंतचा रस्ता रुंदीकरण करणे आवश्यक आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देखभाल दुरुस्तीसाठी महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे.
पुनावळे ते रावेत मुकाई चौकापर्यंतच्या ४५ मीटर रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी पेव्हटेक कन्सल्टंट यांची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. सांगवी- किवळे रस्त्यावरील सांगवी फाटा येथील ढोरे पाटील सब-वे ते परिहार चौकातून औंधकडे जाणाºया पुलापर्यंतचा रस्ता विकास आराखड्याप्रमाणे विकसित करणे, देहू कमान ते झेंडेमळा रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण करणे, मुंबई- पुणे रस्त्यावरील ग्रेड सेपरेटरची देखभाल, दुरुस्ती करणे, अंतर्गत स्ट्रक्चरची तपासणी आणि सुधारणा करण्यासाठी तसेच केएसबी चौकातील ग्रेड सेपरेटरच्या भागातील रिटेनिंग वॉल बांधण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे.
या वेगवेगळ्या कामांसाठी नियुक्त करण्यात येणाºया या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांना निविदापूर्व व निविदापश्चात कामासाठी महापालिकेच्या प्रचलित पद्धतीनुसार निविदा रकमेच्या २.३५ टक्के, अधिक सेवा कर असे शुल्क देणार आहे. या शिवाय सांगवी-किवळे रस्त्यावर पार्क स्ट्रीट समोर सब-वे बांधण्यासाठी, सांगवी फाटा ते किवळे रस्त्यावर रक्षक चौक येथे सब-वे बांधण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. या सल्लागारांना निविदापूर्व कामांसाठी सर्वेक्षण करण्याकरिता १ लाख १० हजार, वाहतूक सर्वेक्षण करण्यासाठी ४५ हजार रुपये, सर्वसाधारण आराखड्यासाठी ४५ हजार रुपये, अर्थसंकल्प तयार करणे आणि त्याची महापालिकेच्या तांत्रिक विभागाकडून मान्यता घेण्यासाठी १ लाख ५० हजार रुपये, निविदा संच तयार करणे, निविदापूर्व बैठकीस उपस्थित राहणे, निविदांची तांत्रिक छाननी करणे व अभिप्राय सादर करणे या कामांसाठी शुल्क देण्यात येणार आहे.