मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पिंपरीच्या महापौर व उपमहापौरांचे राजीनामे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 05:13 PM2018-07-24T17:13:41+5:302018-07-24T17:29:50+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून जोरदार राजकारण सुरू आहे. पालिकेतील पदाधिकारी बदलावरून भाजपच्या दोन गटांमध्ये चांगलेच वातावरण तापले होते.
पिंपरी चिंचवड :मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार महापालिकेचे महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दोघांनीही आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून जोरदार राजकारण सुरू आहे. पालिकेतील पदाधिकारी बदलावरून भाजपच्या दोन गटांमध्ये चांगलेच वातावरण तापले होते. शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौर, उपमहापौर यांचे राजीनामे घेण्याचे आदेश पक्षनेतृत्वाला दिले. आदेशावरून दोघांचेही राजीनामे घेण्यात आले. उपमहापौर मोरे यांंनी धी महापौरांकडे राजीनामा दिला. त्यानंतर महापौर काळजे यांनी आयुक्त हार्डीकर यांच्याकडे राजीनामा दिला आहे.
राजीनामा दिल्यानंतर महापौर काळजे व उपमहापौर मोरे यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले. काळजे म्हणाले, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची सत्ता आली आणि मला महापौर होण्याचा पहिलाच मान मिळाला. त्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. महापौरपदाच्या कार्यकालात त्यात अनेक विकासकामे मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला. अनेक कामे पूर्ण झाली, याचा मला अभिमान वाटतो.
उपमहापौर शैलजा मोरे म्हणाल्या , राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना थेट राजकारणात आले आणि गृहिणी ते उपहापौर बनले. सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी सहकार्य केल्यामुळे उपमहापौरपदाची कारकीर्द यशस्वीपणे पार पडली. यावेळी पक्षनेते एकनाथ पवार,अनुप मोरे,प्रवक्ते अमोल थोरात,प्रमोद निसल,कमल घोलप,उत्तम केजळे, कैलास बारणे,सचिन चिखले आदी उपस्थित होते.