रस्ता सुरक्षा अभियान - मावळात विविध उपक्रम
By admin | Published: January 24, 2017 01:58 AM2017-01-24T01:58:41+5:302017-01-24T01:58:41+5:30
देहूरोड पोलीस ठाणे व ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री शिवाजी विद्यालयात २८ व्या राष्ट्रीय
देहूरोड : देहूरोड पोलीस ठाणे व ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री शिवाजी विद्यालयात २८ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा पंधरवड्याला सुरुवात करण्यात आली.
ग्रामीण पोलीस, देहूरोड पोलीस वाहतूक शाखा, श्री शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांच्या संदर्भात नागरिकांत जनजागृती निर्माण व्हावी या
उद्देशाने देहूरोड ठाण्याचे निरीक्षक अरुण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक निरीक्षक अजित दळवी, ज्योती पाटील, मनोहर संकपाळ, वाहतूक विभागातील नारायण जमादार, आर. बी. दौंडकर, संदीप शिंदे, नवनाथ ननावरे व शिक्षक यांच्या उपस्थितीत रॅलीचे आयोजन झाले.
रॅलीत विद्यार्थ्यांनी ‘वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा’, ‘वाहन चालविताना मोबाइल वापरू नका’, ‘सुरक्षित गती हीच जीवनाची हासी’, ‘एका क्षणाची घाई, आयुष्य वाया जाई’, ‘अती घाई संकटात जाई,’ आदी घोषणा देत शिवाजी विद्यालय, आंबेडकर रस्ता, देहूरोड बाजारपेठ, मंडई मार्गावर जनजागृती केली.
जनजागृतीसाठी वर्दळीच्या ठिकाणी, महामार्गावर, मुख्य चौकांत व पेट्रोलपंपांवर जनजागृतीचे फलक लावले आहेत. देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्ग व मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर पट्ट्या बसविण्यात आल्या. वाहनचालकांना तिळगूळ व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. विकासनगर व किवळे परिसरातील विद्यालयातील विद्यार्थ्यांना सुरक्षित वाहतुकीबाबत वाहतूक शाखेच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले.
देहूरोड ठाण्यात आयोजित कार्यक्रमात विस्डम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्याचा कारभार कसा चालतो, याची माहिती देण्यात आली. पोलीस दल वापरात असलेल्या शस्रांची पोलिसांकडून माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी पोलिसांना विविध प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली. (वार्ताहर)