बनावट विदेशी मद्याचा साठा जप्त
By admin | Published: March 5, 2017 04:24 AM2017-03-05T04:24:07+5:302017-03-05T04:24:07+5:30
बनावट विदेशी स्कॉच मद्य तयार करून विक्री करणाऱ्यावर तळेगाव दाभाडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमाटणे (ता.मावळ) येथे कारवाई करुन ३,६८.०८७ रुपयांचा
वडगाव मावळ : बनावट विदेशी स्कॉच मद्य तयार करून विक्री करणाऱ्यावर तळेगाव दाभाडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमाटणे (ता.मावळ) येथे कारवाई करुन ३,६८.०८७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. एकास अटक करण्यात आली असून उर्वरित दोन संशयीत आरोपींचा शोध सुरु आहे.
नारायण प्रेमजी पटेल ( रा. कसबापेठ, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे. निरीक्षक दीपक परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पटेल हा बनावट विदेशी स्कॉच मद्य तयार करून विक्री विकत असल्याची माहिती मिळाल्याने तळेगाव दाभाडे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सापळा रचला.
आरोपी पटेल दुचाकीवरून बनावट विदेशी स्कॉच मद्याच्या पाच बाटल्या घेऊन जात असल्याचे आढळल्याने त्याला ताब्यात घेऊन पुढील तपास केला. त्यातून कृष्णकुंज ६८६ जुनी सांगवी ता. हवेली येथे छोटेखानी खोलीत एक लिटरच्या ७२ विविध ब्रँडच्या भरलेल्या बनावट विदेशी स्कॉचच्या सीलबंद बाटल्या तसेच एक लिटरच्या ७३ रिकाम्या बाटल्या व ब्रँडची बुचे, लेबल, खोके, पिशव्या व बनावटीचे इतर साहित्य असा एकूण ३,६८,०८७ रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. तो मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालातील ब्रँडची बाजारातील किमंत खिशाला न परवडणारी आहे. त्यामुळे त्याच नावाने बनावट मद्य कमी किंमतीत विकून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. अहमदनगर येथे बनावट दारू पिवून मृत्युमुखी पडलेल्या घटना ताजी असतानाच या कारवाईस महत्व प्राप्त झाले आहे. (वार्ताहर)