अजगराची चोरी केली सर्पमित्रानेच? दोन सुरक्षारक्षकांवर कारवाई; तक्रार दाखल करण्यास लागले तीन दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 04:23 AM2017-08-24T04:23:13+5:302017-08-24T04:23:17+5:30
संभाजीनगर, चिंचवड येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी सर्पोद्यानातून दोन अजगरांची चोरी झाली आहे. सोमवारी गुन्हा घडला असताना तीन दिवसांनी गुन्हा दाखल झाला आहे. ही चोरी सर्प हाताळण्याची माहिती असणा-यांनीच केली असावी
पिंपरी : संभाजीनगर, चिंचवड येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी सर्पोद्यानातून दोन अजगरांची चोरी झाली आहे. सोमवारी गुन्हा घडला असताना तीन दिवसांनी गुन्हा दाखल झाला आहे. ही चोरी सर्प हाताळण्याची माहिती असणा-यांनीच केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात असून, याप्रकरणी दोन सुरक्षारक्षकांची बदली केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने संभाजीनगरात सर्पोद्यानाची निर्मिती केली आहे. या ठिकाणी आजपर्यंत ४ मगरींचा मृत्यू, ७ मगरी गायब, ५० मृत सापांचा खच, २ अजगर गायब, किंग कोब्राचा मृत्यू, कासवाची पिलेचोरी असे प्रकार घडले आहेत. मात्र, महापालिका प्रशासनाने याबाबत गांभीर्याने निर्णय घेतलेले नाही. प्राणिसंग्रहालयातील प्राणिसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही घटना घडल्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे, उद्यान विभागाचे प्रमुख सुरेश साळुंखे आदी उपस्थित होते. तसेच तक्रार दाखल करण्यास वेळ का लागला, याची चौकशी केली जाणार आहे. भारतीय जातीचे दोन अजगर असून, त्यातील एक अजगर साडेसात फूट लांबीचा आहे. त्यामुळे ज्या व्यक्तीला साप कसे पकडतात किंवा कसे हाताळतात, याची माहिती असणारी व्यक्तीच ही चोरी करू शकते, असा अंदाज प्राणिप्रेमींनी व्यक्त केला आहे.
सीसीटीव्ही बसविणार
आजवर झालेल्या चोरीच्या घटनांची गंभीर दखल आयुक्तांनी घेतली आहे. त्यामुळे या ठिकाणी सीसीटीव्ही बसवावेत, तसेच सुरक्षारक्षक वाढवावेत, रात्रीची गस्त वाढवावी अशा सूचना केल्या. चोरी झाली त्या वेळी कामावर असणाºया दोन सुरक्षारक्षकांची बदली केली असून, त्याजागी दुसरे सुरक्षारक्षक नियुक्त केले आहेत. तसेच आणखी एक सुरक्षारक्षक वाढविला आहे. तसेच गुन्हा दाखल करण्यास तीन दिवसांचा कालावधी का लागला, याचीही चौकशी करणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे यांनी सांगितले.
सर्पोद्यानाला केंद्र सरकारच्या झू अॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या नवीन आराखड्यानुसार नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी १४४ कोटी मंजूर झाले असून, कामांचे भूमिपूजन झाले. या नूतनीकरणामध्ये प्राणिसंग्रहालयात उभयचर प्राण्यांसाठी कक्ष निर्माण करणे, सरपटणाºया प्राण्यांसाठी घाट निर्माण करणे, प्रेक्षक दालन तयार करणे, मगर, सुसर, कासव यांसारख्या प्राण्यांसाठी तलाव निर्माण करणे आदी कामे केली जाणार आहेत.