वडगाव मावळमध्ये शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत दुकानासह संसारोपयोगी साहित्य जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 11:41 AM2018-01-24T11:41:05+5:302018-01-24T11:45:27+5:30
परिसरात वीज वाहिनीच्या शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत एका स्टेशनरी दुकानासह दोन कुटुंबाच्या घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना बुधवार (दि. २४) पहाटे दीडच्या सुमारास वडगाव येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिराजवळ घडली.
वडगाव मावळ : परिसरात वीज वाहिनीच्या शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत एका स्टेशनरी दुकानासह दोन कुटुंबाच्या घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना बुधवार (दि. २४) पहाटे दीडच्या सुमारास वडगाव येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिराजवळ घडली.
झोपेत असताना वीज वाहिनीच्या जळणाऱ्या धुराच्या उग्र वासाने अजीज तांबोळी यांना जाग आल्याने जीवितहानी वाचली. काही वेळातच भीषण आगीत उघड्या डोळ्यादेखत कष्टातून उभारलेले लाखो रुपयांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. घरातील गॅस सिलेंडर वेळीच बाजूला केल्याने धोका टाळला. घराच्या बाजूला सिमेंटच्या भिंती असल्याने आग बाजूला पसरू शकली नाही.
अनिस गुलाबभाई तांबोळी व अजीज गुलाबभाई तांबोळी या दोन भावांचे कुटूंब राहत होते. अजित तांबोळी यांचे स्टेशनरीचे दुकान होते. बुधवारी पहाटे दीडच्या सुमारास वीज वाहिनीचे शॉटसर्किट होऊन अचानक आग लागली. या आगीत दुकान व घरातील सर्वच वस्तू जळून खाक झाल्या. तांबोळी कुटुंबीयांच्या आरडाओरड्याने परिसरातील बंटी वाघवले, महेंद्र भालेकर, राजू चव्हाण, मोईस गांधी, उमाकांत गाडे, मंगेश खैरे, सौरभ दुगम, अभिजित ढमाले, सचिन ओसवाल, रोहिदास म्हाळसकर, बाळासाहेब ढोरे, पंढरीनाथ भिलारे, सोमनाथ काळे आदींनी आग विजवली.
विद्युत महावितरण अभियंता विजय जाधव म्हणाले, घटनास्थळाची पाहणी करुन त्याबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठविला जाईल.