महिलांसाठी स्मार्ट स्वच्छतागृह, महापालिकेचा पुढाकार, कासारवाडीत उभारणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 06:09 AM2017-09-10T06:09:25+5:302017-09-10T06:09:38+5:30
स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणा-या पिंपरी-चिंचवड शहरात महिलांसाठी स्वच्छतागृहांचा अभाव होता. शहरात अपवादात्मक स्वरूपात महिलांसाठी स्वच्छतागृह दिसून येत होती.
पिंपरी : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणा-या पिंपरी-चिंचवड शहरात महिलांसाठी स्वच्छतागृहांचा अभाव होता. शहरात अपवादात्मक स्वरूपात महिलांसाठी स्वच्छतागृह दिसून येत होती. शहराचा सर्वांगिण विकास साधत असताना, महिलांच्या स्वच्छतागृह सुविधेचा विसर पडला होता. मात्र, शहराचा समावेश स्मार्ट सिटीत झाल्याने महापालिका प्रशासनाने महिला स्वच्छतागृहांचा विषय गांभीर्याने घेतला असून, शहरात स्मार्ट स्वच्छतागृह उभारणीसाठी पुढाकार घेतला आहे.
शहराची लोकसंख्या २० लाखांच्यावर गेली आहे. ठिकठिकाणी महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधा नसल्याने त्यांची कुचंबना होते. स्वच्छता अभियान राबविताना, स्वच्छतेच्या उपाययोजनांकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. शहरात सार्वजनिक मुताºयांचाही अभाव दिसून येत आहे. पिंपरी कॅम्प आणि परिसरातील सार्वजनिक मुता-यांच्या जागेवर अतिक्रमणे झाली. महिलांसाठी तर स्वच्छतागृह सुविधाच उपलब्ध करून दिली नव्हती. विलंबाने का होईना महापालिकेला महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्याचे सुचले. याबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.